६५ लाखांचे अपहार प्रकरण : आमदारांसह ११ जणांचाही मोबाईल 'नॉट रिचेबल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 02:34 PM2022-02-09T14:34:52+5:302022-02-09T14:39:11+5:30
उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली.
यवतमाळ : नगरपरिषदेच्या ६५ लाख रुपयांच्या घनकचरा संकलन घोटाळ्यात मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी लेखी तक्रार दिल्यापासून गुन्हा नामदेव ससाणे दाखल होईपर्यंत प्रत्येक गोष्टीची कुणकुण या प्रकरणातील ११ ही दोषींना लागली होती. तांत्रिक तपासाच्या आधारावर मोबाईल लोकेशन घेत कुठल्याही क्षणी पोलीस आपल्याला अटक करू शकतात याची भीती त्यांना होती. त्यातूनच आमदार नामदेव ससाने यांच्यासह १५ ही जणांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मोबाईल बंद केले असून ते सर्व फरार आहेत.
उमरखेडच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार उघडकीस आला आहे. २०१७-१८ मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ संरक्षण घनकचरा वाहतूक आणि सपाटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते शेख जमील अहमद उस्मान यांनी केला. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाने सुनावणी करून २१ जानेवारी रोजी या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उमरखेडचे मुख्याधिकारी चारूदत्त इंगुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आमदार नामदेव ससाने यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नगरपालिकेच्या या ६५ लाखांच्या प्रकरणात भाजपचे विद्यमान आमदार नामदेव ससाने, दिलीप सुरते, सविता पाचकोरे, राष्ट्रवादीचे माजी नगराधअयक्ष व विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, शिवसेनेचे अनमोल तिरंगकर या राजकीय लोकांवर तसेच तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, तत्कालीन आरोग्य निरीक्षक विशाल श्रिवास्तव, कंत्राटदार गजानन मोहळे, फिरोज खान व नांदेड येथील पल्लवी एंटरप्राईजेस अशा ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्य प्रकरणातील भ्रष्टाचारही काढणार
उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली. मात्र, नगरपरिषदेत इतरही अनेक बोगस प्रकार आहेत. त्याचीही लेखी तक्रार करून भ्रष्टाचार बाहेर काढू असे मत याचिकाकर्ते तथा नगरपरिष देतील विरोधी गटनेते नगरसेवक जलील कुरेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.