९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:50 PM2020-07-17T23:50:00+5:302020-07-17T23:50:02+5:30

९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.

MLA requested Gadkari for 931 crores | ९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे

९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे

Next
ठळक मुद्देकेंद्रीय रस्ते निधी मिळविण्यासाठी धडपड

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांमार्फत एकूण ३६ कामांचे हे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे राज्य शासनाकडे निधीची टंचाई आहे. अत्यावश्यक कामांना ३३ टक्के निधी दिला जाणार आहे. मार्च २०१९ ला दिलेला शेकडो कोटींचा निधी बीडीएस प्रणालीत तांत्रिक दोष दाखवत शासनाने परत घेतला. नवे टेंडर घेणाऱ्या कंत्राटदारांकडून मार्च २०२२ पर्यंत पैसे मागणार नाही असे लिहून घेतले जात आहे. यावरून राज्य शासनाची आर्थिक स्थिती लक्षात येते. म्हणून राज्यातील बहुतांश आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केंद्र सरकारकडून निधी द्यावा यासाठी साकडे घातले आहे. त्यात भाजपच्या आमदारांची संख्या अधिक आहे. एकट्या अमरावती विभागातून केंद्रीय रस्ते निधीचे ३६ कामांचे प्रस्ताव शासनाला सादर केले गेले. त्यापोटी ९३१ कोटी २६ लाख ९४ हजार रुपये एवढ्या निधीची मागणी केली गेली.

बहुतांश प्रस्ताव भाजप आमदारांचे
‘सीआरएफ’च्या ३६ प्रस्तावांमध्ये बहुतांश भाजप आमदारांचे आहेत. रवी राणा (बडनेरा) १८१ कोटी ३८ लाख, सुलभा खोडके (अमरावती) ५३ कोटी ७५ लाख, हरीश पिंपळे (मूर्तीजापूर) ९ कोटी, संदीप धुर्वे (आर्णी) १४५ कोटी ७१ लाख, प्राचार्य डॉ. अशोक उईके (राळेगाव) १८१ कोटी ९९ लाख, मदन येरावार (यवतमाळ) ६७ कोटी ८३ लाख तर नामदेव ससाने (उमरखेड) यांनी ७७ कोटी ३२ लाखांची मागणी प्रस्तावाद्वारे नोंदविली आहे. याशिवाय काँग्रेसचे पुसद येथील विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी ६० कोटी चार लाख तर भाजपचे पुसद येथील विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांनी ३९ कोटी १८ लाखांच्या निधी मागणीचे प्रस्ताव दिले. भाजपचे माजी आमदार तथा माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (मोर्शी) यांचे ३५ कोटी ८० लाख तर माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील (अकोला) यांचे ३० कोटींचे प्रस्ताव शासनाला आधीच सादर झाले आहेत.

खासदार रक्षा खडसे यांची सर्वाधिक कामे
‘सीआरएफ’च्या सर्वाधिक नऊ कामांचे प्रस्ताव रावेर येथील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिले आहेत. या नऊ कामांची एकूण किंमत ४९ कोटी २६ लाख एवढी आहे. आमदार राजेश एकडे यांच्या नावाने हे प्रस्ताव दिले गेले.

तीनही अधीक्षक अभियंत्यांकडून आलेले ‘सीआरएफ’च्या कामांचे ३६ प्रस्ताव छाननी करून शासनाला सादर करण्यात आले आहेत.
- प्रशांत नवघरे,
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती

Web Title: MLA requested Gadkari for 931 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.