"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 03:47 PM2022-07-06T15:47:26+5:302022-07-06T15:52:46+5:30
गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले.
यवतमाळ : आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबाबत नेहमीच आदर राहील, आणि मातोश्रीचे दार उघडल्यास परत जाऊ, असे विधान बंडखोर आमदार संजय राठोड यांनी केले. यासह, संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला असल्याचेही संजय राठोड म्हणाले.
संजय राठोड हे राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर बुधवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांचे स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना राठोड यांनी शिवसैनिकांशी भांडण नसल्याचे सांगितले. आम्ही अचानक उठाव केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आपल्या विरोधात भूमिका घेतली. मात्र आता गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे ते म्हणाले. तसेच, माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे असलेले फोटो कधीही काढणार नसल्याचे देखील संजय राठोड यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ज्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले त्यांना देखील योग्य वेळी उत्तर देऊ असे राठोड यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्यामुळे झाला उठाव
महाविकास आघाडीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडण्यामागे संजय राऊत हेच जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचेशी चर्चेकरिता तयार झाले होते, आदित्य ठाकरे हे सुरत येथे जाणार होते, मात्र राऊत यांनी होणारी मध्यस्ती बिघडविली, असा गौप्यस्फोट संजय राठोड यांनी केला. यवतमाळ मध्ये बोलताना त्यांनी सत्तांतरणापूर्वीचा घटनाक्रम सांगितला. एकनाथ शिंदे सुरतला गेल्यानंतर गुलाबराव पाटील, दादा भुसे व आपण स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून शिंदे यांना परत बोलविण्याबाबत नियोजन करीत होतो. त्याला उद्धव ठाकरे तयार झाले मात्र संजय राऊतांनी सर्व बिघडविले असेही राठोड यांनी सांगितलं.