आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:03 IST2024-07-25T18:01:38+5:302024-07-25T18:03:02+5:30
Yavatmal : दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त

MLA sir, Can you drink the contaminated water; The villagers got angry
लोकमत न्यूज नेटवर्क :
राळेगाव : तालुक्यातील कोची येथे गेल्या दीड वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. आरोग्य धोक्यात टाकून संपूर्ण ग्रामस्थच दूषित पाणी पित आहेत. काही केल्या कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले. राळेगाव येथे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ग्रामस्थ धडकले. आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा, असे आव्हान करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोची येथील ग्रामस्थांना मिळणाऱ्या मिळणाऱ्या पाण्याने कपडे आणि भांडीसुद्धा धुणेही अशक्य आहे. हीच पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या सुरू असलेल्या जनता दरबारात धडक दिली. शंकर जवादे आणि सचिन गोफणे यांनी एका बाटलीत दूषित पाणी आणून आमदारांसमोर पिऊन दाखविली आणि आमदारांनादेखील ते पाणी पिऊन दाखविण्याची मागणी केली. आमदारांनी ते पाणी पिण्यासाठी नकार दिला. लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करून गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्यावर गावकऱ्यांचे समाधान झाले नाही. दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त झाले आहेत. अनेकांना यापूर्वी पाण्यातून संसर्ग झाला होता, तरीदेखील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळू शकले नाही.