आमदारांनी दिग्रसमध्ये प्रशासनाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:44 AM2021-05-08T04:44:00+5:302021-05-08T04:44:00+5:30
दिग्रस : इसापूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन आमदार संजय राठोड यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या ...
दिग्रस : इसापूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन आमदार संजय राठोड यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पालन न झाल्याने संताप व्यक्त केला.
आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी पुसद रस्त्यावरील इसापूर येथील कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनी आठ दिवसांपूर्वी तेथे जेवणाच्या तक्रारी वाढल्यामुळे प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाॅझिटिव्ह रुग्णांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना गैरसोयी निस्तारून त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप जेवणात काहीच सुधारणा झालेली दिसली नाही. अंडी, फळे, दूध देण्यात आले नव्हते. वृत्तपत्रेही ठेवण्यात आली नव्हती. नळांना पाणीसुद्धा येत नव्हते. बाॅथरूम व हाॅलमध्ये घाण साचली होती.
सेंटरमध्ये काहीच सुधारणा झाली नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोविड सेंटर प्रमुख आणि डॉक्टरांची कानउघाडणी केली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. येत्या आठ दिवसांत कोविड सेंटरमध्ये सुधारणा न झाल्यास सेंटर बंद करू आणि रुग्णांची इतरत्र व्यवस्था लावू, असा इशारा आमदार राठोड यांनी दिला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, रुग्णालय अधीक्षक डॉ. आर.डी. राठोड, तहसीलदार राजेश वजिरे, डॉ. के.सी. बाणोत, डॉ. अभय गोविंदवार, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम ठक्कर, अमोल राठोड आदी उपस्थित होते.
बॉक्स
संबंधितांवर कारवाईचा दिला इशारा
इसापूर येथील कोविड सेंटरमध्ये सूचना देऊनही सुधारणा झाली नाही. यामुळे संतापलेल्या आमदार संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई करू, असा इशारा दिला. तसेच सेंटरला कशाचीही आवश्यकता असल्यास लेखी निवेदन द्या, तोंडी माहिती देऊन चालणार नाही, असा दमही भरला.