मनसेने साधला आमदारांवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:13+5:30
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी नेमके काय केले, याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याचेही उंबरकर म्हणाले. वणी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णायाचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने पाठपुरावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ३० खाटांच्या वणी ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय १७ जानेवारी २०१३ ला निर्गमीत केला होता. मात्र विद्यमान आमदारांनी हा निर्णयच दडपून ठेवला, असा घणाघाती आरोप मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी नेमके काय केले, याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याचेही उंबरकर म्हणाले. वणी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णायाचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने पाठपुरावा केला. मनसेचे तत्कालिन दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी तत्कालिन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या माध्यमातून सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा आराखडा तयार केला. त्यात आरोग्य विभागाने वणी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्रदान केला. संजीवरेड्डी बोदकुरवार सन २०१४ पासून आमदार आहेत. शासन निर्णय काय आहे, त्याची व्याप्ती किती, नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न, कोरोना महामारीचे संकट, कोविड सेंटरची दुर्दशा, आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव, याकडे त्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे उंबरकर म्हणाले. वणी परिसरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे वणी ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर सुरू करावे तसेच ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा द्यावा, अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनाला जनतेने सहकार्य करावे
वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. इतर ठिकाणी उपजिल्हा रूग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले. मात्र वणीत अद्यापही उपजिल्हा रूग्णालय म्हणून मंजूर झालेल्या ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले नाही. यासंदर्भात मनसे लवकरच आंदोलन करणार असून नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन राजू उंबरकर यांनी केले आहे.
उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल दोन वर्षाने मी आमदार झालो. माझ्या काळात मी सातत्याने याविषयात पाठपुरावा केला. परंतु त्यावेळी शिवसेनेचे आरोग्यमंत्री असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याविषयात अद्यापही माझा पाठपुरावा सुरूच आहे.
- संजीवरेड्डी बोदकुरवार
आमदार, वणी विधानसभा क्षेत्र