स्वतंत्र विदर्भासाठी मोबाईल जाम आंदोलन
By admin | Published: August 1, 2016 12:45 AM2016-08-01T00:45:55+5:302016-08-01T00:45:55+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता तरुणाई पुढे सरसावली असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या
युवा आघाडी : यवतमाळातून लोकप्रतिनिधींना पाठविले पाच हजार संदेश
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता तरुणाई पुढे सरसावली असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने रविवारी मोबाईल जाम आंदोलन केले. तब्बल पाच हजार मोबाईल एसएमएस त्यांनी लोकप्रतिनिधींच्या मोबाईलवर पाठविले.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी युवा आघाडीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विदर्भातील ११ ही जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. गत आठवड्यात शेकडो युवकांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविले होते. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींना संदेश पाठविले जात आहे. रविवारी याच मागणीसाठी युवा आघाडीच्या नेतृत्वात मोबाईल जाम आंदोलन करण्यात आले. अमरावती विभाग युवक आघाडीचे प्रमुख प्रदीप धामणकर, निखील खरोडे, राहुल खारकर यांच्या नेतृत्वात मोबाईल जाम आंदोलन करण्यात आले. एकाच वेळीच तब्बल पाच हजार संदेश लोकप्रतिनिधींच्या मोबाईलवर पाठविण्यात आले. असेच आंदोलन संपूर्ण विदर्भात करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन आणखी प्रभावी करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवार ३१ जुलै रोजी तरुणांनी आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींच्या मोबाईलवर एसएमएस पाठविले. त्यात स्वतंत्र विदर्भ राज्य कधी मिळणार या संदेशातून करण्यात आली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता तरुणांनी हाती घेतले असून लोकप्रतिनिधींना या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यवतमाळ शहरात या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यापुढेही आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)