मोबाईल मेडिकल प्रकल्प गुंडाळणार; ३१ जिल्ह्यातील ४० युनिट होणर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 01:23 PM2022-03-29T13:23:55+5:302022-03-29T13:32:42+5:30
या प्रकल्पाद्वारे राज्यातील ३१ जिल्ह्यात ४० युनिटच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविली जात होती. आता ते सर्व गुंडाळले जाणार आहेत.
विलास गावंडे
यवतमाळ : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेला मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प गुंडाळला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील ३१ जिल्ह्यात ४० युनिटच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविली जात होती. या युनिटची सर्व ८० वाहने ५ एप्रिलपर्यंत परिवहन (आरोग्यसेवा) विभागात जमा केली जाणार आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्र सक्षम झाल्याचे सांगत, मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक युनिटमध्ये डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट नियुक्त होते, शिवाय प्रसूतीची सोयही करण्यात आली होती. अत्याधुनिक अशी ही रुग्णवाहिका होती. दुर्गम भागातील रहिवासी ठिकाणापासून जवळपास कुठे आरोग्य सेवा नसलेल्या भागात हे मेडिकल युनिट जाऊन औषधोपचार केला जात होता. २०११ पासून ही सेवा सुरू करण्यात आली होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे युनिट चालविले गेले. रुग्णवाहिका आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी वाहन होते. त्यासाठी चालकही नियुक्त करण्यात आले होते. कालांतराने ही सेवा प्रभावी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले. बहुतांश वाहने भंगारात गेली. शिवाय आता मोबाईल युनिटच्या माध्यमातून जी सेवा पुरविली जात होती, ती आरोग्यवर्धिनी केंद्रात दिली जात आहे. त्यामुळे मोबाईल युनिट गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक चार युनिट विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल गोंदिया आणि नंदूरबार जिल्ह्यात प्रत्येकी तीन युनिट कार्यरत होते. नांदेडमध्ये दाेन युनिट आहेत. ३१ पैकी हे चार जिल्हे वगळता इतर ठिकाणी प्रत्येकी एक मोबाईल युनिट आहे. आता ते सर्व गुंडाळले जाणार आहेत.
सेवा मिळत नसल्याची ओरड
मोबाईल युनिटच्या माध्यमातून योग्य ती आरोग्यसेवा मिळत नसल्याची ओरड नागरिकांमधून केली जात होती. काही राजकीय लोकांच्या संस्थाच हे युनिट चालवीत होत्या. काही युनिट तर बऱ्याच वर्षांपूर्वी निरुपयोगी झाले होते. आता केवळ अतिदुर्गम भागात हे युनिट आवश्यकतेनुसार चालविले जाण्याचे नियोजन केले जात आहे.