'यापुढे अठरा वर्षांखालील मुलांच्या हाती देणार नाही मोबाईल'; यवतमाळ जिल्ह्यातल्या बान्शी ग्रामपंचायतीचा निर्धार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 06:26 PM2022-11-16T18:26:40+5:302022-11-16T18:29:03+5:30

Yawatmal News बान्शी ग्रामपंचायतीने आता १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइल बंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे.

'Mobile phones will no longer be given to children under the age of eighteen'; The determination of Banshi Gram Panchayat in Yavatmal district! | 'यापुढे अठरा वर्षांखालील मुलांच्या हाती देणार नाही मोबाईल'; यवतमाळ जिल्ह्यातल्या बान्शी ग्रामपंचायतीचा निर्धार!

'यापुढे अठरा वर्षांखालील मुलांच्या हाती देणार नाही मोबाईल'; यवतमाळ जिल्ह्यातल्या बान्शी ग्रामपंचायतीचा निर्धार!

Next
ठळक मुद्देमोबाईलविरुद्ध ग्रामपंचायतीचा एल्गारपालकांचे समुपदेशन, नंतर ठोठावणार दंड


बालाप्रसाद सोडगिर

यवतमाळ  : संवाद क्षेत्रातील चमत्कार म्हणून मोबाइलकडे पाहिले जाते. परंतु संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा जास्तीचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने आता १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइल बंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे.

मोबाइलमुळे संवाद क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या उपकरणाचे मोठे फायदे असल्याने अल्पावधीतच मोबाइल प्रत्येकाच्या हाती दिसू लागला. मात्र मनोरंजन आणि गेमिंगसह इतर गैरप्रकारासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने चिमुकल्यांसह तरुण पिढीवर विपरित परिणाम होत असल्याने पालकांसाठीही मोबाइल ही बाब आता चिंतेची ठरत आहे. त्यामुळेच पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने थेट ग्रामसभेत ठराव घेऊन १८ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाइल वापर करण्यास मनाई केली आहे. मंगळवारी झालेल्या याच ग्रामसभेत गावात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेत निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा संकल्पही करण्यात आला.

अल्पवयीन मुले मोबाइलच्या विळख्यात अडकल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मोबाइलचा गैरप्रकारांसाठी वापर होत असल्याच्या घटना पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी १८ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालायला हवी, अशी मागणी केली. ही मागणी सरपंच गजानन टाले यांच्यासह सदस्यांनी उचलून धरली. ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोबाइलचा अतिवापर अडथळा ठरत आहे. मोबाइल वापरावर बंदी घातल्यास विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील, तसेच पारंपरिक मैदानी खेळामधील रुची पुन्हा या विद्यार्थ्यांत वाढेल, या हेतूनेच ग्रामपंचायतीने मोबाइल बंदीचा हा ठराव घेतला असल्याचे सरपंच गजानन टाले आणि उपसरपंच रेखा राठोड यांनी सांगितले.

या ग्रामसभेला ग्रामसचिव पी. आर. आडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष आगलावे, अभय ढोणे, माधव डोंगरे, इंदूताई तांबारे, शोभा आगलावे, मंगल शर्मा, सुनीता लथाड, पंकज बुरकुले, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख, आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक विकास अधिकारी डॉ. गोरमाळी आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अनेक विद्यार्थी मोबाइलमध्ये तासन् तास पब्जीसह इतर खेळ खेळत असल्याचे दिसून आले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागल्याने ग्रामपंचायतीला मोबाइल वापर बंदीचा ठराव घ्यावा लागला. मोबाइल वापरामुळे मुलांची मानसिकता बदलू लागली होती. त्यांच्यामध्ये चिडचिडेपणाही वाढत असल्याच्या पालकांच्याच तक्रारी होत्या. ग्रामपंचायतीच्या वतीने या निर्णयाची चोख अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- रेखा राठोड, उपसरपंच, बान्शी (ता. पुसद, जि. यवतमाळ)

 

गावाच्या हितासाठीच मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करताना सुरुवातीला अडचणी येतील, मात्र विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतरही १८ वर्षांखालील मुलांकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंडात्मक कारवाईसह वाढीव टॅक्स लावण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांनी अभ्यासाकडे वळावे हाच या ठरावामागचा उद्देश आहे.

- गजानन टाले, सरपंच, बान्शी (ता. पुसद, जि. यवतमाळ)

Web Title: 'Mobile phones will no longer be given to children under the age of eighteen'; The determination of Banshi Gram Panchayat in Yavatmal district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल