महिला पोलिसांशी अश्लील संभाषण करणाऱ्या मोबाईल रोमिओला अटक
By सुरेंद्र राऊत | Published: May 6, 2023 05:51 PM2023-05-06T17:51:13+5:302023-05-06T17:51:41+5:30
Yawatmal News राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाईल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली.
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाईल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीतून धक्कादायक कारनामा पुढे आला आहे. हा युवक महिला पोलिसांनाच टार्गेट करीत होता. काहींनी त्याच्याविरुद्ध तक्रारी केली तर काहींनी दुर्लक्ष केले. यवतमाळातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी अश्लील संभाषण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होता. यातच त्याला ताब्यात घेण्यात आले.
मारोती सुरेश लगसे (३०) रा. लहु ता. माढा जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मारोतीच्या घरी शेती असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. तो आई-वडिलांना पोलिस उपनिरीक्षक होण्याची तयारी करीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत होता. या पैशाचा वापर तो महिला व मुलींची छेडखानीसाठी करीत होता. पोलिस ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून असल्याची बतावणी मारोती करीत होता. महिला पोलिस हे मारोतीचे सर्वात मोठे टार्गेट होते. यासोबतच त्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही आपल्या जाळ्यात ओढले होते.
मनमाड येथे एका मुलीकडे तो राहायला गेला. पोरगा चांगला आहे, त्याला जावई म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही, असा समज त्या मुलीच्या कुटुंबीयांचा झाला. त्यामुळे सलग चार महिने हा मुलीकडे मुक्कामी होता. मुलीच्या भावाने मारोतीची गावात जावून चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तो रिकाम टेकडा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला घरातून हाकलून देण्यात आले. तरीही मारोतीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
असा करायचा पोलिस महिलांशी संपर्क
महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे सोशल मीडियावर स्टेटस् पाहून त्यांचे नाव व नियुक्तीचे ठिकाण लिहून घेत होता. नंतर त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात फोन करून संपर्क क्रमांक मिळवित होता. मोबाईलवर संपर्क करून महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अश्लील संभाषण करायचा. कुणाला प्रेमाची मागणी घालायचा. यवतमाळच्या महिला अधिकाऱ्यासोबतही त्याने असाच प्रकार केला. महिला अधिकाऱ्याने दुर्लक्ष न करता तक्रार दाखल केली.
सायबरने शोधले लोकेशन
शहर पोलिसांना सायबर टीमने मोबाईल रोमियोचे लोकेशन ट्रस करुन दिले. त्यानंतर सहायक निरीक्षक जनार्धन खंडेराव, रवी नेवारे, सुनील फलटने, राजू कांबळे, अंकुश फेंडर यांनी आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. मारोती लगसे याने १५ ते १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार पुढे आला आहे. आणखीही त्याच्याविरोधात तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. यवतमाळ पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून ८ मेपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.