अट्टल गुंडांवर मोक्का, एमपीडीए लावाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:00 AM2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:02+5:30
पोलीस महासंचालकांनी काही महिन्यांपूर्वी राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘टू-प्लस’ योजना जारी केली होती. याअंतर्गत दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. यातील अद्यापही सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारी, एमपीडीए, मोक्का यासारखी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच कारवाईचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व एसडीपीओ व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अट्टल व क्रियाशील गुंडांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर मोक्का, एमपीडीएसारखी धडक कारवाई करा, असे आदेश मंगळवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी येथे दिले.
पोलीस महासंचालकांनी काही महिन्यांपूर्वी राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘टू-प्लस’ योजना जारी केली होती. याअंतर्गत दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. यातील अद्यापही सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारी, एमपीडीए, मोक्का यासारखी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच कारवाईचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व एसडीपीओ व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस ठाणे व उपविभागीयनिहाय टू-प्लस योजनेअंतर्गत केलेल्या कारवाईची डीआयजींनी माहिती घेतली. मात्र बहुतांश विभागात छाेट्या गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७, ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई, दारू, जुगाराच्या केसेस केल्याचे आढळून आल्याने चंद्रकिशोर मीना यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला छुटपुट कारवाई चालणार नाही तर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झोपडपट्टीदादा कायदा)सारखी धडक कारवाई करा, असे निर्देश देण्यात आले, जिल्हा पोलिसांनी मोठ्यात मोठी तडीपारीची कारवाई केल्याने त्यावर आपण समाधानी नसल्याचे मीना यांनी सांगितले.
ज्यांच्यावर एकापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अद्यापही ते गुन्हेगारीत सक्रिय आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का, एमपीडीएचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. एसडीपीओंनी सादर केलेल्या काही याद्यांमध्ये त्यांनी त्रुट्या काढल्या. गंभीर गुन्ह्यांच्या कारवाईत अनेक नावे का बसत नाहीत, क्रियाशील गुन्हेगार पोलिसांना सापडत का नाही याबाबत जाब विचारला.
बैठकीत पोलिसांनी कारवाईबाबत जे चित्र दाखविले ते योग्य व समर्थनीय नसल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व ठाणेदारांनी गुन्हेगारांची यादी अपडेट करावी आणि महिनाभरात ठोस कारवाई करावी, पुढील महिन्यात आपण पुन्हा ‘टु-प्लस’चा आढावा घेण्यासाठी येऊ, असे मीना यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागाचा स्वतंत्र आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाला यावेळी करण्यात आल्या. डीआयजी गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सर्व एसडीपीओंची तातडीची बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच उपविभागनिहाय दौऱ्याचा कार्यक्रमही निश्चित केला.
कोरोना : वॉच आणि जनजागृतीचेही निर्देश
n जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. त्यानिमित्ताने पोलिसांनीही सक्रिय व्हावे, रेमडेसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार यावर वॉच ठेवावा, कुठे बोगस रुग्ण दाखविले जात आहे का, याचा आढावा घ्यावा अशा सूचना डीआयजी चंद्रकिशोर मीना यांनी बैठकीत दिल्या. शिवाय कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेऊन नागरिकांची जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वाघांचे शिकारी पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
मारेगाव वनपरिक्षेत्रात गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणात शिकारी शोधण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. अशा स्थितीत पाेलीस वनविभागाच्या मदतीला धावले आणि त्यांनी दोनच दिवसात या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला. मुकुटबन पोलीस ठाणे हद्दीतून शिकाऱ्यांच्या टोळीतील बापलेकांना अटक करून त्यांच्या ताब्यातून मृत वाघाचा पंजा, नखे जप्त केली. या कामगिरीच्या निमित्ताने गुरुवारी आढावा बैठकीत पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना व एसपी डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या हस्ते वणीचे एसडीपीओ संजय पु्ज्जलवार, पांढरकवडाचे एसडीपीओ प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी, सायबर सेलचे एपीआय अमोल पुरी यांचा सत्कार करण्यात आला.