मोकाट डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:14+5:30
वारंवार मागणी करूनही वणी नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलल्याने मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअॅप आंदोलन’ सुरू केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही, कोणतीही मागणी करायची नाही, फक्त शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दररोज पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवायचे, अशा स्वरूपाच्या या आंदोलनाची आता नगरपालिका प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेते, याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरात मोकाट डुकरांची संख्या प्रचंड वाढली असून डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर मुक्तपणे धुमाकूळ घालत असल्यामुळे शहरात दररोज अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करूनही वणी नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलल्याने मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअॅप आंदोलन’ सुरू केले आहे.
कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही, कोणतीही मागणी करायची नाही, फक्त शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दररोज पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवायचे, अशा स्वरूपाच्या या आंदोलनाची आता नगरपालिका प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेते, याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वणी शहरात डुकरांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे, की डुकरांचे हे कळप नागरिकांच्या घराच्या आवारात शिरून धुडगूस घालत आहे. ही डुकरे इतकी निडर बनली आहेत की, लहान मुलांवर हल्ल्याचादेखील प्रयत्न करित आहेत. एक महिन्यांपूर्वी खरबडा, गोकुलनगर परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेवर डुकरांचा कळप चालून आला होता. परंतु पालकांनी प्रसंगवधान राखून तिला डुकरांच्या तावडीतून सोडविले होते. डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर सैरावैरा धावत असतात. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांचा अपघात घडतो. एका महिन्यात किमान १० ते १५ अपघात या डुकरांमुळे होत आहेत. यापूर्वी डुकरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने कंत्राटदार नेमला होता. काही दिवस डुकरांना पकडून दूर नेऊन सोडण्यात आले. परंतु ही मोहिम मध्येच थांबली. मोकाट डुकरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. असे असताना नगरपालिका मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
जनभावना लक्षात घेऊन मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअॅप आंदोलन’ सुरू केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील डुकरांच्या कळपाचे फोटो माझ्या वैयक्तीक व्हॉट्सअॅपवर पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तर मुख्याधिकाऱ्यांच्या घरात डुकरे सोडणार
मोकाट डुकरांमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने येत्या आठ दिवसात डुकरांचा बंदोबस्त न केल्यास मनसेच्यावतीने मुख्याधिकाºयांच्या घरात डुकरे सोडण्याचा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.