कायले छापता शेतीची थट्टा...
By admin | Published: November 6, 2014 02:18 AM2014-11-06T02:18:30+5:302014-11-06T02:18:30+5:30
शेती अन् शेतकरी हा थट्टेचा विषय झाला आहे. नापिकीची भळभळणारी जखम पाहून आता कुणालाही शेतकऱ्यांची दया येत नाही.
सुरेंद्र राऊत यवतमाळ
शेती अन् शेतकरी हा थट्टेचा विषय झाला आहे. नापिकीची भळभळणारी जखम पाहून आता कुणालाही शेतकऱ्यांची दया येत नाही. निसर्ग आणि शासनकर्ते निगरगट्ट झाल्याने तुम्ही शेतीची अवस्था कशाही स्वरूपात छापली तरी याचा कोणताच फरक पडणार नाही, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना ‘लोकमत’ जवळ वाट मोकळी करून दिली.
गावात गेल्यानंतर शेतीच्या स्थितीबाबत बोलण्यास फारसे कुणीच इच्छुक नव्हते. हा आतबट्ट्याचा व्यवसाय जिंदगीलाच पुजला आहे. त्यामुळे यावर काय बोलायच असे म्हणून बहुतांश जण आपल्या मनातील शल्य झाकण्याचा प्रयत्न करत होता. शेतकऱ्याला कुणी मदत करेल, अशी आशाच उरलेली नाही. नव्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी लागवड खर्चाच्या ५० टक्के अधिकचा नफा मिळेल असा दर देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर या शासनाने हमी भावात ५० रुपयाची वाढ करून थट्टा केली. त्यापूर्वी राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने शेतीला मुबलक वीज दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. २०१२ मध्ये भारनियमन मुक्त केले जाईल, अशी घोषणा केली होती. आज शेतातील वीज काही तासही राहत नाही. विहिरीवर मोटारपंप आणि पाणी असूनही पीक करपताना पाहण्याची वेळ आली आहे. भारनियमनमुक्तीची घोषणाही शेतकऱ्यांची थट्टा करणारीच ठरली. यावर्षी दुबार-तिबार पेरणीनंतरही सोयाबीनची नापिकी झाली. बाजारात मात्र सोयाबीनचा दर काही केल्या वाढताना दिसत नाही. अशीच कापसाचीही स्थिती आहे. शेतकऱ्याच्या नावाने मते मागणारे, संघटना चालविणारे याबाबत केवळ चर्चा घडवून आणतात. प्रत्यक्षात आजपर्यंत कुठलाच फायदा शेतकऱ्याला झाला नाही.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक सातत्याने आत्महत्या करतो आता शेतकरी आत्महत्येचीही सवय येथील व्यवस्थेला झाली आहे. त्यामुळे नापिकी आणि शेतीच्या स्थितीबाबत माध्यमांनी कितीही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तरी चिरेबंद कान असलेल्या व्यवस्थेला तो ऐकूच येणार नाही. उलट शेतकऱ्यांची थट्टा समाज आणि व्यवस्थेकडून केली जाईल. अडचणीच्या काळात शेतकरी आपल्या वैयक्तिक संबंधातूनच कर्जाऊ रकमा घेऊन हा व्यवसाय चालवितो. शेतीच नापिकी मांडल्यानंतर सावकारही कर्ज देताना व्याजाचा दर वाढवितो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीवर कुणीच काहीही छापू नये, बोलू नये अशा शब्दात संताप व्यक्त केला.