हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी आता राज्यात ‘मॉडेल रेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:29 AM2018-02-11T11:29:41+5:302018-02-11T11:31:55+5:30
हातभट्टीवर रेड करताना आता परंपरागत पद्धतीला मूठमाती दिली जाणार आहे. आता ही कारवाई दोन सरकारी पंचांसमक्ष करणे बंधनकारक आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलिसांकडून हातभट्ट््यांवर धाड टाकून कारवाई केली जाते. मात्र नंतर ती केस न्यायालत टिकत नाही. परिणामी आत्तापर्यंत झालेल्या दहा हजार रेडमध्ये एकाही आरोपीला न्यायालयात शिक्षा झाली नाही. नुसती रेड करून चालणार नाही, तर ती केस न्यायालयातही टिकावी, याासठी पोलीस महासंचालकांनी ‘हातभट्टी रेड’करिता स्वतंत्र निर्देश दिले आहेत.
हातभट्टीवर रेड करताना आता परंपरागत पद्धतीला मूठमाती दिली जाणार आहे. आता ही कारवाई दोन सरकारी पंचांसमक्ष करणे बंधनकारक आहे. शिवाय संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा करून मोहामाच, दारूचे नमुने तत्काळ घेऊन ते जागीच इन कॅमेरा सिल करण्याचे निर्देश आहेत. जप्त केलेले नमुने २४ तासांच्या आत विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्याचा अल्टीमेटमही देण्यात आला आहे.
दारू भट्टीवर रेड केल्यानंतर १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र तयार करण्याचा अवधी दिला. रेड करताना उपस्थित असलेल्यांचा आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविला जाणार आहे. साक्षीदारांची संख्या जेवढी जास्त, तेवढे उत्तम, असेही या मॉडेल रेडच्या मॅन्युअलमध्ये नमूद आहे. दारू गाळप करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत न्यायालयातून सुटका होऊ नये, अशा पद्धतीने दोषारोप पत्र तयार करावेत, असे निर्देश आहेत.
धाडी किती टाकल्या, यापेक्षा कोर्टात किती टिकल्या व शिक्षा झाली, याचे आता स्वतंत्रपणे मूल्यमापन केले जाणार आहे.
आरोपींविरूद्ध ‘एमपीडीए’चा प्रस्तावही
आत्तापर्यंत मटका, जुगार आणि हातभट्टी रेड, हा केवळ सोपस्कार म्हणून पूर्ण केला जात होता. आता संबंधित जमादार अथवा पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. इतर गुन्ह्याप्रमाणे हातभट्टीवरील कारवाईचे मूल्याकंन आता गुन्हे सिद्धवरून ठरणार आहे. त्यामुळे सर्व ठाणेदारांनी आता हातभट्टी मॉडेल रेड करण्यासाठी अधिनस्थ यंत्रणेला कामाला लावले आहे. शक्य झाल्यास एमपीडीएचाही प्रस्ताव अवैध दारू गुत्ते चालविणाऱ्या विरोधात प्रस्तावित केला जाणार आहे.