दंत विभागात मिळणार आधुनिक उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:06 PM2019-07-04T21:06:17+5:302019-07-04T21:06:35+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभाग नामधारीच होता. येथे अतिशय जुजबी उपचार सुविधा मिळत नव्हती. आता या विभागाला नव्याने कार्यान्वित केले जात आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या विभागात दंत महाविद्यालया इतक्या उपचार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभाग नामधारीच होता. येथे अतिशय जुजबी उपचार सुविधा मिळत नव्हती. आता या विभागाला नव्याने कार्यान्वित केले जात आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या विभागात दंत महाविद्यालया इतक्या उपचार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
दंतचिकित्सा विभागात दातांच्या नसांचा उपचार, खर्रा-तंबाखू, गुटखा खाल्ल्याने तोंड बंद झालेल्या रुग्णांवर उपचार, दातांवर लघुशस्त्रक्रिया, अक्कल दाढ काढणे, हिरड्यावरिल गाठ काढण्यात येत आहे. या शिवाय इतरही उपक्रम शिबीराच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. शालेय तपासणी, जनजागृती कार्यक्रम, तंबाखू विरोधी अभियान राबविल्या जाणार आहे. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात अधिष्ठात डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दोन आधुनिक डेंटल चेअर, दोन आरव्हीजी मशीन, रुट कॅनलसाठी लागणारे एन्डोमोटर अॅन्ड अॅपेक्स लोकॅटोर ही अत्याधुनिक सामग्री खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. याचा उपयोग उपचारासाठी होणार आहे. मागील १५ दिवसात २० रुग्णांच्या दातांच्या नासाचा उपचार झाला आहे. सहा महिन्यात येथे २५ रुग्णांवर चेहऱ्याच्या हाडाचे फॅक्चर्स, जबड्याच्या गाठी, कॅन्सरच्या गाठी यावर उपचार करण्यात आले आहेत. रूग्णसेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी डॉ. सुरेंद्र गवार्ले व प्रभारी विभाग प्रमुख डॉ. आशा काळबांडे, सहायोगी प्राध्यापक डॉ. स्मिता खडसे, सहायक प्राध्यापक डॉ. अंकुश सुने, दंतचिकित्सक डॉ. देवेंद्र गावंडे, डॉ. रैना मुडे, डॉ. नम्रता ढुमे, डॉ. कौशल माथूर परिश्रम घेत आहे. त्यांनी दंतचिकित्सा विभागाचा पूर्णत: कायापालट केला आहे.
जिल्ह्यात दंत व मुखरोग रुग्णांची संख्या मोठी आहे. आताही बाह्य रुग्ण तपासणी विभागात दिवसाला ६० ते ७० रुग्ण तपासणीकरिता येतात. यातील दहा ते बारा रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने दीर्घ उपचार करणे आवश्यक असते. साधनांअभावी या रुग्णांची परवड होत होती.