मोदी अन् जनता हा मजबूत जोड, नाळ थेट जुळलेली : मुख्यमंत्री शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:57 AM2024-02-29T07:57:54+5:302024-02-29T07:58:01+5:30
मोदी-जनता असा हा फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सामान्य माणसाच्या हितासाठी सतत झटणारे, एक दिवसाचीही रजा न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट जनतेशी नाळ जुळली आहे. यामुळेच मोदी-जनता असा हा फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
घर-घर मोदीसह आता मन-मन मोदी असे समीकरण झाले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. या डबल इंजिनमुळेच महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे ते म्हणाले. ‘अब की बार - चारसौ पार’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातून ४५ हून अधिक जागा एनडीएच्या वाट्याला येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. देशाला पाच ट्रिलियन डॉलर्सची महासत्ता बनविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी निश्चित केले असून महाराष्ट्राचा वाटा त्यात एक ट्रिलियन डॉलर असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नारीशक्तिच्या मदतीने राज्याच्या विकासाचा रथ गतिमान : देवेंद्र फडणवीस
माता सीतेचे देशातील एकमेव मंदिर यवतमाळ जिल्ह्यात आहे. याच ठिकाणाहून पंतप्रधानांनी ‘नारी शक्ती वंदन कार्यक्रमा’ची घोषणा केली आहे. आज चतुर्थीचा दिवस असून वर्ध्याहून कळंबच्या चिंतामणी मंदिरापर्यंत धावणाऱ्या रेल्वेचेही लोकार्पण केले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा रथ वेगाने धावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही महिलांंना केंद्रस्थानी ठेवून लेक लाडकी योजनेसह परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये महिलांना सवलत दिली आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी समूहातील दहा लाख कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा निर्धार असून, या घरावर पुरुषासोबत महिलेचेही नाव राहील, असेही ते म्हणाले.
राज्य चालविताना शिवरायांचा आदर्श : उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राला दिशा देण्यात, घडविण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यासह जिजाऊ, सावित्री, रमाई या आदर्श महिलांमुळे हा महाराष्ट्र घडला आहे. शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना सन्मान होता. तोच विचार घेऊन महाराष्ट्र पुढे जात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मातृशक्ती वंदन, उज्ज्वला योजना, बेटी बचाव योजना यांसह महिलांसाठी विविध याेजना राबवून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार सरकारने घेतला असून दहा कोटी महिला स्वयंसाहाय्यता गटांशी जोडल्या गेल्या आहेत. येणाऱ्या काळात या महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या दिसतील, असे ते म्हणाले.
मोंदींनी केले या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी वर्धा-कळंब या ३९ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वेलाइन व प्रवासी रेल्वेचा प्रारंभ करण्यात आला. तसेच अंमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वेलाइन (३२ कि.मी.) व प्रवासी रेल्वेचा प्रारंभ झाला. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना अंतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी सिंचन योजनांचे लोकार्पण करण्यात आले. वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० चे चौपदरीकरण आणि साकोली-भंडारा सी प्रकल्प तसेच सालई खुर्द-तिरोडा हा प्रकल्पही राष्ट्रास अर्पण करण्यात आला. याबरोबरच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लाभार्थ्यांना दहा लाख घरे देण्याचे नियोजन असलेल्या मोदी आवास योजनेचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एक करोड आयुष्यमान कार्डवाटपाची यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात झाली.