मोहन प्रकाश, अशोक चव्हाण करणार नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:34 PM2017-10-14T23:34:02+5:302017-10-14T23:34:15+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील पक्षाचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून हा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आतापर्यंत २१ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून ७०० पेक्षा अधिक लोक बाधित झाले आहे. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलेले नाही. २१ मृत्यू होऊनही एका कृषी विकास अधिकाºयाचे निलंबन वगळता कुणावरही ठोस कारवाई झालेली नाही. याच मुद्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी सांगितले. फवारणीतील मृताच्या कुटुंबांना तत्काळ दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी, बाधितांच्या कुटुंबांनाही मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.