सभापतिपदी मोहोड, राठोड, देवसरकर, पोटे यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:24+5:30
पालकमंत्री संजय राठोड यांचे ज्येष्ठ बंधू शिवसेनेचे विजय राठोड यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या जयश्री पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित दोन सभापती पदांसाठी शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड आणि काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांची निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदी सोमवारी चारही सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेवर आता महाविकास आघाडीचे राज्य पूर्णपणे स्थापन झाले आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांचे ज्येष्ठ बंधू शिवसेनेचे विजय राठोड यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या जयश्री पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित दोन सभापती पदांसाठी शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड आणि काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांची निवड झाली. विजय राठोड यांचे सूचक म्हणून विनोद खोडे होते. तर जया पोटे यांचे सूचक म्हणून अनिल देरकर आणि श्यामला कमठेवाड होत्या. मोहोड यांचे सूचक निखील जैत तर देवसरकर यांचे सूचक पुण्यरथा भडंगे आणि अरुणा खंडाळकर होत्या.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गटनेते बाळासाहेब कामारकर यांची निवड झाली होती. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर जिल्हा परिषदेतही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेनेला अध्यक्ष पदासह दोन सभापती पदे, काँग्रेसला दोन सभापती पदे आणि राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सहाही पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. सोमवारी निर्धारित वेळेपर्यंत विरोधकांचे अर्ज न आल्याने पीठासीन अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दुपारी ३ वाजता आयोजित विशेष सभेत या चौघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यामुळे आता जिल्हा परिषदेवर पूर्णपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
भाजपची सपशेल शरणागती
चारही सभापती पदांसाठी विरोधी भाजपने एकही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपने सपशेल शरणागती पत्करण्यात आल्याचे दिसून आले. या निवडीत दिग्रस विधानसभा मतदारसंघाला झुकते माप मिळाले आहे. अध्यक्ष पदानंतर एक सभापतीपदही दारव्हा तालुक्याला मिळाले. गेल्या वेळी चार महिला व दोन पुरुष पदाधिकारी होते. यावेळी ही स्थिती नेमकी उलट झाली असून चार पुरुष व दोन महिला पदाधिकारी आहेत. या निवडीत जया पोटे यांना ऐनवेळी लॉटरी लागली. त्यांच्या ऐवजी भलतीच तीन नावे आधी चर्चेत होती. मात्र ऐनवेळी पोटे यांनी बाजी मारली.