पांढरकवड्याच्या साजीद टोळीवर अखेर ‘मोक्का’
By admin | Published: August 28, 2016 12:06 AM2016-08-28T00:06:02+5:302016-08-28T00:06:02+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा येथे ट्रक चालकाचा खून केल्याप्रकरणातील आरोपी शेख साजीद टोळीच्या पाच सदस्यांवर ‘मोक्का’
महानिरीक्षकांची मंजुरी : ट्रक चालकाच्या खुनातील तिघे फरारच
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा येथे ट्रक चालकाचा खून केल्याप्रकरणातील आरोपी शेख साजीद टोळीच्या पाच सदस्यांवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावण्यात आला आहे. अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मोक्काच्या या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली.
आरोपींमध्ये शेख साजीद शेख अब्दूल गफ्फार (३५) रा. पांढरकवडा, शेख फारुक शेख हारुन (२८), अनिल सुरेश जाधव, गोलू उर्फ महिंद्र कवडू तुपट आणि नरेश विजय खवले यांचा समावेश आहे. यातील अनिल व गोलू यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. अन्य तिघे मात्र घटनेपासून फरार आहे. १७ मार्च २०१६ रोजी महामार्गावर ट्रक लुटण्याची योजना साजीद टोळीने आखली होती. ते रूईगाठी घेऊन जाणारा एक ट्रक पळविण्याच्या बेतात होते. त्यांनी त्या ट्रकचा चालक सुब्रमण्यम याचा खून केला. त्याला रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले. त्यानंतर हा ट्रक पळून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव तेथे पोहोचले. त्यांच्या पोलीस शिपायाने साजीदला ओळखले. मात्र पोलिसांच्या हालचाली होण्यापूर्वीच साजीद व साथीदार पळून गेले. पोलीस वेळीच पोहोचल्याने ट्रक पळवून नेण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला. वडकी पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२, ३९४, ३९६ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गेल्या पाच महिन्यांपासून वडकी, पांढरकवडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला साजीद टोळीच्या तीन फरार सदस्यांचा शोध घेता आलेला नाही. यातील दोघांना घटनेच्या दुसऱ्या दिवशीच अटक करण्यात आली होती. आता या टोळीला ‘मोक्का’अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले जाईल.