आर्णीतील ३९ ग्राहकांचे पैसे बँकेकडे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:35+5:302021-07-20T04:28:35+5:30
जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. यात बँकेचे चार कर्मचारी दोषी आढळले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. ...
जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. यात बँकेचे चार कर्मचारी दोषी आढळले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. दरम्यान, आजपर्यंत १२० ग्राहकांचे दोन कोटी ४७ लाख ४९३ रुपये बँकेने दोन टप्प्यांत परत केले. यासाठीसुद्धा ग्राहकांना आंदोलन करावे लागले होते.
आता ३९ ग्राहकांना बँकेकडून आजही पैसे घेणे आहेत. याबाबत बँकेकडे विचारणा केली असता या ग्राहकांची तपासणी तज्ज्ञांकडून सुरू असल्याचे सांगितले जाते. तपासणीनंतर त्यांना पैसे परत करू, असे सांगण्यात आले आहे. किती रक्कम द्यायची आहे, हे मात्र बँकेने सांगितले नाही. बँकेत पैसे अडकून पडल्याने ग्राहकांचे आर्थिक हाल होत आहेत. कुणाच्या घरचे विवाह अडकले, तर कुणाचे उपचार थांबले आहेत. अनेकांना शेतातील कामासाठी पैसे मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
बॉक्स
स्थानिक गुन्हे शाखेला दिले पत्र
बँकेच्या यवतमाळ येथील मुख्य शाखेने संबंधित ३९ ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या तपासणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेला पत्र पाठविले आहे. मात्र, त्या पत्राचे पुढे काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तपासणी अहवालानंतर ग्राहकांना पैसे देऊ, असे बँकेचे येथील शाखा व्यवस्थापक रणजीत गिरी यांनी सांगितले.