बेंबळाच्या पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:05 PM2018-04-10T23:05:52+5:302018-04-10T23:05:52+5:30
अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे. मात्र बेंबळा हा सिंचन प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पैसे मोजावे लागणार आहे. परिणामी त्याचा भार यवतमाळातील सर्वसामान्य ग्राहकांवरच येणार आहे. बेंबळाचे पाणी शहरात आले तरी सर्वाधिक भिस्त निळोणा आणि चापडोह या दोन हक्काच्या प्रकल्पावरच राहणार आहे.
यवतमाळ शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभरानंतरही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे यवतमाळकरांची तहान टँकरने भागविली जात आहे. अशा परिस्थितीत बेंबळा प्रकल्प यवतमाळकरांसाठी वरदान आहे. या प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी ३०२ कोटींचा अमृत प्रकल्प शहरासाठी मंजूर झाला. पाणीटंचाईत दिलासा देण्यासाठी या प्रकल्पाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. मे महिन्यापर्यंत पाणी मिळेल, असे प्रशासकीय स्तरावरून सांगितले जात असले तरी अद्यापही या पाण्याबद्दल कुणीही खात्रीशिरपणे सांगत नाही. मात्र आता हा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील असल्याने त्या प्रकल्पातील पाणी जीवन प्राधिकरणाला विकत घ्यावे लागणार आहे.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोनही प्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्यासाठी प्राधिकरणाला पैसे मोजावे लागत नाही. परंतु बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेताना प्रत्येक दशलक्ष घनमीटरला चार ते पाच लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही रक्कम जीवन प्राधिकरणाच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष भार यवतमाळ शहरातील नळ ग्राहकांवर येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सध्यातरी पर्यायी प्रकल्प म्हणूनच उपयोगात आणण्याचा विचार जीवन प्राधिकरणाचा आहे. सुरुवातीला निळोणा आणि चापडोह याच प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना वितरित केले जाईल. मात्र अमृत योजनेत २४ तास आणि सात दिवस अशी अट असल्याने बेंबळा प्रकल्पच ही अट पूर्ण करू शकते. त्यामुळे बेंबळा प्रकल्पाचे पाणी विकत घ्यावे लागणार आहे.
संचय क्षमता वाढविणार
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाची संचय क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून खोदकाम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पावर आता जीवन प्राधिकरणाने लक्ष केंद्रीत केले आहे.
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची साठवण क्षमता ३२२ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पात निळोणा सारखे ५० प्रकल्प बसतात. पाच वर्षे पुरेल इतके पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बेंबळा प्रकल्पाची आहे. विशेष म्हणजे २०७८ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित राहील असे डिझाईन तयार करण्यात आले आहे. निळोणा प्रकल्पाची साठवणूक क्षमता ६.३९ दशलक्ष घनमीटर तर चापडोह प्रकल्पाची साठवण क्षमता १३.५९ दशलक्ष घनमीटर आहे. परंतु आता दोनही प्रकल्प यवतमाळ शहरासाठी अपुरे ठरत आहेत.