विदर्भात सहा महिन्यांत २० हजार झाडांची कत्तल; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 12:52 PM2021-10-20T12:52:31+5:302021-10-20T12:58:12+5:30
विदर्भात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे.
विलास गावंडे
यवतमाळ : वृक्ष लागवडीच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाच, दुसरीकडे बेसुमार अवैध वृक्षतोड केली जात आहे. विदर्भात मागील सहा महिन्यांत (१ जानेवारी ते ३० जून २०२१) सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. या प्रकारात २ कोटी ९४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा वनवृत्तामध्ये येणाऱ्या २० वनविभागात झालेल्या अवैध वृक्षतोडीने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अवैध वृक्षतोडीमध्ये सागवान वृक्षाला लक्ष्य करण्यात आले आहे. सहा महिन्यांत सहा हजार २३७ सागवानाच्या झाडांवर आरा चालविण्यात आला आहे. त्यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ वनवृत्तामध्ये झालेली वृक्षतोड पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे.
नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविली आहे. सर्वाधिक सागवान व इतर प्रकारच्या वृक्षांची अवैध तोड गडचिरोली वनवृत्तात झाली आहे. या क्षेत्रात सात हजार २१६ झाडे तोडण्यात आल्याने ८७ लाख ८४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याखालोखाल नागपूर वनवृत्तात अवैध वृक्षतोड झाली. पाच हजार ६१ झाडे तोडून २८ लाख ५० हजार रुपयांचा दणका या वनवृत्ताला बसला आहे.
चंद्रपूर वनवृत्तातील दोन हजार ९१५ झाडे अवैधरित्या कापण्यात आली. त्यामुळे १७ लाख ३० हजार रुपये नुकसानीची झळ या वनवृत्ताला पोहोचली आहे. अमरावती वनवृत्तातील दोन हजार ९४२ झाडे तोडण्यात आल्यामुळे ५२ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ वनवृत्तात दोन हजार ५७८ झाडांवर कुऱ्हाड चालविली गेली. १४ लाख ७८ हजार रुपयांच्या नुकसानीला हे वनवृत्त बळी ठरले आहे. या प्रत्येक वनवृत्तामध्ये सागवान वृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणात झाली आहे.
सिरोंचात सर्वाधिक झाडे तोडली
गडचिरोली वनवृत्तात येणाऱ्या सिराेंचा वनविभागात तीन हजार ४८ झाडे अवैधरित्या कापण्यात आली आहेत. तब्बल ६५ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान या विभागाला झाले. विदर्भात सर्वाधिक वृक्षतोड याठिकाणी झाली आहे.
यवतमाळात सागवानावर हात
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभागाचा वृक्षतोडीचा आकडा मोठा आहे. याठिकाणी सागवान आणि इतरप्रकारची १०४४ झाडे अवैधरित्या तोडण्यात आली. सहा लाख ९७ हजार रुपयांचा दणका या विभागाला बसला आहे. त्याखालोखाल यवतमाळ (५७४), वाशिम (९८), पांढरकवडा (४६२) विभागात वृक्षतोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ वनविभागातील ५७४ वृक्षतोडीमध्ये ५१६ झाडे सागवानाची आहेत. पुसदमध्येही ९६६ सागवान वृक्ष कापण्यात आले.
वनवृत्तातील वृक्षतोड, नुकसान (लाखात)
वनवृत्त - तोडलेली झाडे - नुकसान
चंद्रपूर - २९१५ - १७.३०
गडचिरोली - ७२१६ - ८७.८४
नागपूर - ५०६१ - २८.५०
अमरावती - २९४२ - ५२.५२
यवतमाळ - २५७८ - १४.७८