जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, आदिवासी, सिंचन, शिक्षणावर अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 05:00 AM2021-03-28T05:00:00+5:302021-03-28T05:00:15+5:30
पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी विविध ठिकाणी केलेेल्या कामांचा अनुभव विशद केला. या अनुभवाच्या आधारावर जिल्ह्यात विकासकामे साध्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यावर प्रथम फोकस राहणार असून, रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यातील कोविड केंद्र वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. लसीकरणाचे प्रमाण वाढविले जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वाढविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कृषी, सिंचन, शिक्षण, आदिवासी विकास आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी विविध ठिकाणी केलेेल्या कामांचा अनुभव विशद केला. या अनुभवाच्या आधारावर जिल्ह्यात विकासकामे साध्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यावर प्रथम फोकस राहणार असून, रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यातील कोविड केंद्र वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. लसीकरणाचे प्रमाण वाढविले जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वाढविणार आहे.
जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी कृषी क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. विविध योजनांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आदिवासी विकासाच्या प्रश्नावर काम केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील वातावरण निर्मितीवर भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
हार-तुरे नाकारून थेट कामाला सुरुवात
शनिवारी अमोल येडगे १२ वाजेच्या सुमारास यवतमाळात पोहोचले. त्यांनी पदभार स्वीकारला आणि लगेच केंद्र शासनाच्या आरोग्य सचिवांच्या व्हीसीकरिता ते हजर झाले. दुपारी ३ पर्यंत व्हीसी चालली. नंतर त्यांनी लगेच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे त्यांना पदभार देण्याच्या वेळी मावळते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह उपस्थित नव्हते.
नवे जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्यातील, २०१४ ची बॅच
येथील नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे सातारा जिल्ह्यातील कराळ तालुक्याच्या अभयचीवाडी या गावचे मूळ रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले येडगे २०१४ च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी यापूर्वी नाशिक विभागीय कळवण येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. ते बीड जिल्हा परिषदेत १७ महिने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांची मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. ११ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनविण्यात आले. १५ महिन्यांनंतर त्यांना आता यवतमाळचे जिल्हाधिकारी बनविण्यात आले आहे.
मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी अखेरची राजकीय धडपड
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना बाजूला करून त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. एम.डी. सिंह यांच्या बदलीबाबत स्थानिक सत्ताधारी राजकीय नेते अखेरपर्यंत अनभिज्ञ होते. बदलीची माहिती मिळाल्यानंतर ती थांबविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. १३ महिन्यांपूर्वी एम.डी. सिंह येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या ते ‘गुड बूक’मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मध्यंतरी महसूल व आरोग्य यंत्रणा विरोधात गेल्याने उद्भवलेल्या वादात यशस्वी मध्यस्थी करून राठोड यांनी त्यांना जिल्हाधिकारी पदावर कायम ठेवले. मात्र, शुक्रवारी रात्री एम.डी. सिंह यांच्या बदलीचे आदेश जारी होईपर्यंत स्थानिक राजकीय स्तरावर याची कुणाला साधी पुसटशी कल्पनाही नव्हती. बदली आदेश धडकल्यानंतर राजकीय स्तरावरून थेट मुंबईत संपर्क करून बदली रोखण्याचा अखेरचा प्रयत्न केला गेल्याचे समजते. बदली करताना आपल्याला साधे विश्वासात घेतले गेले नाही, अशी नाराजीही स्थानिक राजकीय स्तरावरून मुंबईत नोंदविली गेली. मात्र, अखेरपर्यंत प्रयत्न करूनही राजकीय नेत्यांना एम.डी. सिंह यांची बदली थांबविण्यात यश आले नाही. नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मंगळवारी येथे रुजू होण्याचे नियोजन होते. मात्र, त्यांनी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर तातडीने रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळीच अमोल येडगे येथे रुजू झाले. त्यानंतर त्यांनी लगेच कोरोना व्हिसीला हजेरी लावली. आता एम.डी. सिंह यांना नवी नियुक्ती कार्यकारी पदावर मिळते की अकार्यकारी याकडे नजरा आहेत.