कार्यालयात कमी अन् टपरीवरच जास्त
By admin | Published: September 1, 2016 02:33 AM2016-09-01T02:33:06+5:302016-09-01T02:33:06+5:30
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी अन् चहा
जिल्हा परिषद : सामान्य प्रशासन उदासीन
यवतमाळ : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी अन् चहा टपरीवरच जादा दिसून येतात. बुधवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास तर चक्क सामान्य प्रशासन विभागाचे म्होरकेच चहाचे घोट रिचविण्यात मग्न होते.
जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात सुमारे १५ हजारांच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर कोणत्याच कार्यालयांतर्गत एवढे कर्मचारी कार्यरत नाही. यात शिक्षकांसह शिक्षण आणि आरोग्य विभागात सर्वाधिक कर्मचारी आहेत. मात्र जिल्हा परिषद इमारतीमधील बहुतांश विभागातील कर्मचाऱ्यांना कामाची ‘अॅलर्जी’ असल्याचे वास्तव आहे. याची प्रचिती जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार येते. हेच वास्तव बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या कामकाजानिमित्त दिल्लीला गेले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी ‘रिलॅक्स’ आहेत. याच संधीचा लाभ घेत बुधवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील ‘म्होरके’ आणि त्यांचे शिष्यवर्गीय कर्मचारी टपरीवर चहाचे घोट रिचविताना दिसत होते. हास्यकल्लोळात ते चहाचे घोट गळ्याखाली उतरवित होते. तिकडे त्यांच्या विभागात जिल्ह्यातील नागरिक चकरा मारत होते. साहेब नसल्याने ते मुकाटपणे परत जात होते. सामान्य प्रशासन विभागच उदासीन असल्याने इतर विभागांची अवस्थाही तशीच होती.
(शहर प्रतिनिधी)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे सतत प्रयत्न केले. सोमवार आणि शुक्रवारी सर्वांना एकाच गणवेशात येण्याचे आवाहन केले. परिणामी अधिकारी व कर्मचारी गणवेशात दिसूही लागले आहेत. मात्र कापडं बदलली तरी सर्वांची मानसिकता जुनीच आहे. काम पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. केवळ सोमवारी आणि शुक्रवारी एकाच गणवेशात सर्व दिसू लागले, एवढाच काय तो फरक दिसत आहे. शिस्त केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येत आहे.