ऑनलाईन रॅकेटमध्ये परराज्यातील अधिक; सावध राहण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 01:39 PM2020-10-14T13:39:53+5:302020-10-14T13:40:51+5:30
सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सवलतींचे कर्ज, निम्म्या रकमेत दुप्पट फायदा अशा अजब सवलतींचे जाळे अवतीभवती विणले गेले आहे. मोबाईलवर लोकांना आमिष दाखवून लूटले जाते. त्यात परराज्यातील लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय जिल्ह्यातील काही लोकही या जाळयात सहभागी आहेत. यात फसलेल्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली, तरी या साखळया तुटता तुटत नाहीत, असेच चित्र आहे.
मार्च ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत १०० च्यावर नागरिकांची फसवणूक झाली. सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.
तीन टक्के व्याजाने कर्ज
मोबाईलवर एक संदेश येतो, तीन टक्के वार्षिक व्याजाने कर्ज मिळेल. हवे असल्यास कॉल करा. लोक त्याला संपर्क करतात. त्याला नियम सांगितले जातात. त्यानुसार, तुम्ही ऑनलाईन कजार्साठी अर्ज करायचा. तुम्ही नोकरी करीत असाल तर पगारपत्रक, व्यवसाय असेल तर दुकानाचा परवाना, पत्ता, आधारकार्ड जोडा. त्याची पडताळणी होईल. तुमचे कर्ज मंजूर झाले आहे. असे सांगितले जाईल, तसा निरोप आल्यावर तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून एक हजार रुपये ऑनलाईन भरावे लागेल. त्यानंतर कर्जमंजुरीचा पहिला हप्ता दहा लाख असेल तर पाच लाख खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्याआधी तुम्हाला १५ हजार रुपये त्यांच्या खात्यावर ऑनलाईन भरावे लागतील. इथे विषय संपतो. कारण तुमच्याकडून १६ हजार रुपये लुटण्यासाठीच ही योजना आहे. कुणीही तुम्हाला कर्ज देणार नाही. आणि तशी अपेक्षाही करुन फसू नका.
विम्यात सवलत...
वाहनाचा विमा काढायचा आहे का, आमच्याकडे सर्व कंपन्यांचा विमा हप्त्यात ७० ते ८० टक्क्यांची सवलत योजना सुरु आहे...असे फोन आता येत आहेत. या कंपन्यांनी ऐवढी सवलत का दिली असेल. याची चौकशी केली असता ही फसवेगिरी असल्याचे समोर आले. कुठल्याच कंपनीने ८० टक्क्यांपर्यंत सवलत योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट प्रतिनिधींपासून सावध राहिले पाहिजे.
मोबाईल रिचार्जचा सापळा
काही दलालांनी मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून ग्राहकांना फसवायला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांचे पैसे भरा आणि एक वर्ष रिचार्ज मिळवा... असा हा फंडा आहे. हाच फंडा डिश टीव्हीच्या रिचार्जसाठीही लावला जातो. त्यात एकदा पैसे भरले की, पहिल्या महिन्याचे रिचार्ज मिळते. मात्र, पुढे गायब असा अनेकांना अनुभव आला आहे. त्यातून हजारे रुपयांची फसवणूक झाली. एका मोबाईल कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधला असता कंपनीने अशी कोणतीही योजना दिली नसल्याचे सांगितले. ही योजना द्यायचीच असती तर साऱ्यांनाच खुली केली असती. असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.