१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 12:18 PM2022-12-13T12:18:10+5:302022-12-13T12:22:15+5:30
टिपेश्वरचा प्रस्ताव धूळखात; पर्यटनाला अशाने चालना मिळणार का?
नरेश मानकर
पांढरकवडा (यवतमाळ) : टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघांची संख्या वाढत आहे. सध्या या भागात १६ पेक्षा अधिक वाघ असून, त्यांना पाहण्यासाठी पर्यटकही भेटी देत आहेत. वन्यप्राण्यांची सुरक्षा व पर्यटनाला चालना देण्यासाठी या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे; परंतु यासाठीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. शासन याबाबतचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नागपूर-हैदराबाद, या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर टिपेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात १६ पेक्षा अधिक पट्टेदार वाघ असून, ही संख्या सतत वाढत असल्याने वाघ अभयारण्याबाहेर येत आहेत. पर्यायाने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाघांनी आतापर्यंत १६ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली आहे. अभयारण्याबाहेर येणारे हे वाघ शेतकऱ्यांचे टार्गेट असतात. अनेकदा सापळे लावून त्यांची शिकार केली जाते किंवा पिकाच्या संरक्षणासाठी कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन या वाघांचा मृत्यू होतो.
हे प्रकार टाळले जावेत, तसेच पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या अभयारण्याला सध्या केंद्रीय वनखात्याचे नियम लागू नाहीत. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास केंद्राचे आणि पर्यटनाचे नियम लागू होतील. त्यातूनच विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. या ठिकाणी वाघांची संख्या वाढायला भरपूर वाव आहे. कोअरझोन, बफरझोन निर्माण केले जात असल्याने वनयंत्रणेची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यातूनच शिकाऱ्यांपासून वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे.
पूर्वी टिपेश्वरचे नियंत्रण हे पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे होते. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले आहे. भाजप-सेना युती सरकारमध्ये महसूल विभागनिहाय नियंत्रणाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार टिपेश्वरचे नियंत्रण अमरावती महसूल विभागातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मार्गी लागण्याची अपेक्षा होती; परंतु अद्यापही धूळखात पडलेला आहे.
पर्यटन वाढीसोबतच रोजगारही वाढेल
१३१.८१ चौरस किलोमीटर कार्यक्षेत्र असलेला वर्धा जिल्ह्यातील बोर हा देशातील सध्याचा सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १४८.६३ चौरस किलोमीटर आहे. छोट्या अभयारण्यालाही व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देणे शक्य असल्याचे यातून स्पष्ट होते. म्हणूनच टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी सतत होत आहे. टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प झाल्यास पर्यटन वाढण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे.