सर्वाधिक नाराज शिवसेनेत
By admin | Published: February 3, 2017 02:07 AM2017-02-03T02:07:06+5:302017-02-03T02:07:06+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुकांची सर्वाधिक संख्या ही शिवसेनेत आहे.
पत्ता कट झाल्याचा परिणाम : नेत्यांपुढे मनधरणीचे आव्हान
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुकांची सर्वाधिक संख्या ही शिवसेनेत आहे. मात्र बहुतेकांचा पत्ता कट झाल्याने त्यांची नाराजी झाली आहे. या नाराजीचा फायदा अन्य पक्षाला होऊ नये म्हणून त्यांची मनधरणी करण्याचे पहिले आव्हान सेना नेत्यांपुढे आहे.
गाव खेड्यांपर्यंत केवळ काँग्रेस व शिवसेना हे दोनच पक्ष पोहचू शकले आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच गावात काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेचेही नेटवर्क आहे. भाजपाच्या नेटवर्कला शहराच्या मर्यादा आहेत. राष्ट्रवादीची अवस्था तर या तीन प्रमुख पक्षांपेक्षा आणखीनच बिकट आहे. काँग्रेस व शिवसेनेची सर्वदूर असलेली बांधणी पाहता त्यांच्याकडे नेते-कार्यकर्त्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. पर्यायाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सत्तेत नसल्याने काँग्रेसकडील गर्दी कमी आहे. परंतु शिवसेनेकडे मात्र तिकीट मागणाऱ्यांची मोठी रांग आहे. अशा स्थितीत नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला थांबवायचे याचा पेच नेत्यांना पडला होता. तरीही शिवसेनेच्या अधिकाधिक जागा याव्या या दृष्टीने तिकीटांचे वाटप झाल्याचा दावा सेनेतून केला जात आहे. भाजपाला रोखणे आणि सेनेच्या जागा वाढविणे हे दुहेरी आव्हान सेना नेत्यांपुढे आहे. दुसरीकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्यांची संख्याही अन्य पक्षांच्या तुलनेत तेवढीच मोठी शिवसेनेत आहे. काही नाराजांनी अखेरच्या क्षणी अन्य पक्षाचा झेंडा हाती घेऊन आपले उमेदवारीचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यात यश आले तर काहींचा हिरमोड झाला. परंतु शिवसेनेसोबत निष्ठा असलेले शेकडो इच्छुक आजही पक्षासोबत आहेत. यातील कित्येकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे मानून गेल्या अनेक महिन्यांपासून गट व गणांमध्ये बांधणी चालविली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. कुठे अन्य पक्षातून आलेल्याला तर कुठे यादीत मागे असलेल्याला अचानक पुढे आणून उमेदवारी दिली गेली. विविध कारणांनी नाराज असलेल्या परंतु पक्षातच राहण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसैनिकांचा कल निवडणूक काळात नेमका कुणाकडे राहणार याचा अंदाज सेना नेते बांधत आहेत. ही नाराज मंडळी एकतर घरात बसून राहील, पर्यायाने त्यांच्या जनसंपर्काचा शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा होणार नाही किंवा आपली ताकद दाखविण्यासाठी हा नाराज शिवसैनिक भाजपा किंवा अन्य पक्षाच्या उमेदवाराला कुठे उघड वा कुठे छुपी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे पहिले आव्हान सेना नेत्यांपुढे राहणार आहे.
नाराजीचा सर्वाधिक फटका हा लालदिव्याच्या प्रकाशात लखलखणाऱ्या दारव्हा-दिग्रस तालुक्याला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिग्रस तालुक्यात तर आधीच भाजपाची ताकद अचानक वाढली आहे. शिवसैनिक भाजपाला क्रमांक एकचा शत्रू मानत आहे. कारण भाजपाने शिवसेनेकडील जिल्ह्याचे पालकमंत्री पद अचानक काढून घेतले आहे. त्यामुळे संतापलेल्या नेत्यांनी भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीत आडवे करण्याची सिंहगर्जना जाहीररीत्या केली आहे. भाजपा आडवी न झाल्यास ही सिंहगर्जना व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपात नाराज होणार तरी कोण ?
जिल्ह्यात पाच आमदार व त्यात एकाकडे पालकमंत्रीपद असल्याने यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात पहिल्यांदाच भाजपा पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. त्यातच शिवसेनेने आडवे करण्याची जाहीर भाषा वापरल्याने भाजपाचे नेते-पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमाने भिडून आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात लढण्यासाठी भाजपाकडे पुरेसे सक्षम उमेदवारच नाही. कारण गेली अनेक वर्ष भाजपाने गावखेड्यापर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी, आपले नेटवर्क उभे करण्यासाठी प्रयत्नच केलेले नाहीत. पर्यायाने भाजपावर जिल्ह्यात उमेदवारांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. भाजपाला अखेरपर्यंत अन्य पक्षातील नाराजांवर अवलंबून रहावे लागले. पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अनेक नावे होती. मात्र ते पुरेसे सक्षम उमेदवार नव्हते. त्यामुळे ते निष्ठावंत असले तरी त्यांना थांबवून अन्य पक्षातील ‘आयारामांना’ भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपामध्ये फार कुणी नाराज होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. छुटपुट नाराजी असली तरी ती दूर करण्याची जबाबदारी संबंधित आमदार व नेत्यांवर सोपविली गेली. ही नाराजी संपविण्याची खरी अडचण आहे ती सेना व नंतर काँग्रेसपुढे.
‘तू तयारीला लाग’चा फटका सर्वाधिक
गेल्या काही महिन्यात सेना नेत्यांनी तिकीटाची इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येकालाच ‘तु तयारीला लाग’ हा दिलेला शब्द आता अडचणीचा ठरला आहे. या शब्दामुळे शिवसैनिकांच्या तिकीटाच्या अपेक्षा वाढल्या आणि तिकीट न मिळाल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे अनेक शिवसैनिकांच्या मनात जणू सुडाची भावना धगधगताना दिसते आहे. त्यात निवडणूक रिंगणातील पक्षाचा अधिकृत उमेदवार होरपळला जाण्याची भीती आहे.