जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट
By admin | Published: April 17, 2017 12:17 AM2017-04-17T00:17:31+5:302017-04-17T00:17:31+5:30
जिल्ह्यातील जवळपास सर्व एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पैसे असूनही ग्राहकांना दुसऱ्यापुढे हात पसरावा लागत आहे.
ग्राहक त्रस्त : पैसे असूनही हात पसरण्याची वेळ
यवतमाळ : जिल्ह्यातील जवळपास सर्व एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पैसे असूनही ग्राहकांना दुसऱ्यापुढे हात पसरावा लागत आहे. तर काहींचे संपूर्ण व्यवहारच रखडले आहे.
जिल्ह्यात विविध बँकांनी १९८ एटीएम केंद्र थाटले आहे. बहुतांश ग्राहकांकडे एटीएम कार्ड आहे. बँकेत जाऊन रांगेत लागण्यापेक्षा एटीएममधून चुटकीसरशी पैसे निघत असल्याने नागरिक एटीएमलाच पसंती देतात. मात्र नोटाबंदीच्या काळानंतर हे कार्डही टाकावू ठरले आहे. ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर सुरूवातीच्या काळात मोजकेच पैसे काढता येत होते. नंतर पैसे काढण्याची मर्यादा वाढत गेली. मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने मर्यादा वाढवूनही ग्राहकांना त्याचा लाभ झाला नाही.
सध्या यवतमाळ शहरासह सर्वच तालुका स्थळावरील एटीएममध्ये खडखडाट आहे. बहुतांश एटीएम रिकामे आहे. मोजक्याच ठिकाणी पैसे निघत आहे. त्यामुळे ग्राहक सतत एटीएमच्या चकरा मारत आहे. मात्र तरीही त्यांना पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे.
आपलेच पैसे असूनही ते वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना हात उसणे पैसे घ्यावे लागत आहे. अनेकांना नाईलाजाने उधारी करावी लागत आहे. मात्र ज्यांची बाजारात पत नाही, त्यांना पैसे असूनही भिकाऱ्यासारखे जिणे जगावे लागत आहे.
जिल्ह्यातील १९८ पैकी तब्बल ८४ एटीएम स्टेट बँकेचे आहेत. मात्र यातील बहुतांश एटीएममध्ये पैसेच नाहीत. काही बँकांच्या एटीएममध्ये पैसे आहेत. मात्र त्यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल सुरू आहे. तळपत्या उन्हात त्यांना अशा एटीएमचा शोध घ्यावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी हात झटकले
या गंभीर समस्येबाबत स्टेट बँक आणि अग्रणी बँकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी चक्क हात झटकले. एकाने आपण सुटीवर असून प्रवासात असल्याचे सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आपण चक्क आउट आॅफ स्टेशन असल्याचे सांगून हात वर केले. यामुळे सामान्य ग्राहकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण झाला.
कॅशचा प्रचंड तुटवडा
कॅशचा मोठा तुटवडा असल्याने सर्व एटीएममध्ये खडखडाट असल्याचे अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले. हा तुटवडा कधी संपेल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमुळे कॅशचा हा तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.