बहुतांश बँकांचे एटीएम रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:29 PM2017-12-21T21:29:05+5:302017-12-21T21:29:32+5:30
जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे पेक्षा अधिक एटीएम असून सर्वाधिक स्टेट बँकेचे आहेत. यातील बहुतांश एटीएम रामभरोसे आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड असुरक्षित आहे.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे पेक्षा अधिक एटीएम असून सर्वाधिक स्टेट बँकेचे आहेत. यातील बहुतांश एटीएम रामभरोसे आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड असुरक्षित आहे. भंडाराच्या घटनेची जिल्ह्यातील कोणत्याही एटीएममध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारा जिल्ह्यातील तूमसर येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम १९ डिसेंबरच्या रात्री फोडण्यात आले. गॅस कटरने हे एटीएम फोडले गेले. स्फोट झाल्याने रक्कम पळविण्याचा इरादा फसला. मात्र त्यात एक लाख १२ हजारांच्या नोटा जळाल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील एटीएमची सुरक्षा स्थिती काय ? यावर बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटी देऊन प्रातिनिधीक स्वरूपात पाहणी केली असता जणू धोक्याची सूचना मिळाली. बहुतांश एटीएमवर केव्हाही चोरी-दरोड्याची घटना घडू शकते, अशी चिन्हे दिसून आली.
अलार्म वाजला तरी कुणी ढुंकूनही पाहात नाही
आवाज झाला ‘रुटीन’
बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील विजया बँकेच्या एटीएमचा अलार्म वाजत होता. मात्र कुणीही त्याकडे ढुंकून पाहिले नाही. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. यावरून अलार्मची किती दखल घेतली जाते, हे लक्षात येते. अनेक बँकांच्या एटीएमचे तर अलार्म विनाकारण वाजताना दिसतात. अलार्म ऐकताच पूर्वी धावत जाणारे लोक आता त्याकडे ‘रुटीन’ म्हणून दुर्लक्ष करतात.
स्टेट बँकेचे जिल्ह्यात सर्वाधिक ८४ एटीएम
अलाहाबाद ५, आंध्रा २, एक्सीस ११, बडोदा ६, बँक आॅफ इंडिया ११, महाराष्टÑ २०, कॅनरा २, सेंट्रल २३, कार्पोरेशन १, एचडीएफसी ७, आयसीआयसीआय ४, आयडीबीआय ४, इंडियन १, ओव्हरसीज २, पंजाब नॅशनल ३, हैदराबाद २, स्टेट बँक ८४, सिंडीकेट १, युको १, युनियन १, विजया १. एकूण - २००.
एटीएमला पूर्वी बँका सुरक्षा गार्ड पुरवित होत्या. मात्र आता नियम बदलला. काही ठिकाणी सुरक्षा गार्ड आहेत. तर काही ठिकाणी नाहीत. परंतु प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही व अलार्म लावण्यात आले. त्यामुळे सुरक्षा गार्ड नसले तरी तेथील माहिती तत्काळ मिळते. यानंतरही स्थानिक पातळीवर एटीएमची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. दुर्गम भागात रात्रीला एटीएम बंद असतात.
- कैलास कुमरे
व्यवस्थापक, अग्रणी बँक.