यवतमाळातून वणीमार्गे चंद्रपुरात सर्वाधिक दारू पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:00 AM2021-05-28T05:00:00+5:302021-05-28T05:00:02+5:30

राज्यात वर्धा व गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरातही दारूबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळासह अनेक जिल्ह्यांत दारूबंदीची मागणी होऊ लागली. त्यासाठी ग्रामीण भागांतून मोठमोठी आंदोलनेही उभी झाली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढले गेले. एकीकडे नव्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदीची मागणी होत असताना चंद्रपुरातील दारूबंदीचा फेरविचार करावा, असा सूर समाजाच्या विविध गटांमधून ऐकायला मिळाला.

Most liquor supply from Yavatmal to Chandrapur via Wani | यवतमाळातून वणीमार्गे चंद्रपुरात सर्वाधिक दारू पुरवठा

यवतमाळातून वणीमार्गे चंद्रपुरात सर्वाधिक दारू पुरवठा

Next
ठळक मुद्देबंदी उठल्याने ‘दुकानदारी’ बंद होणार : तस्करीआड होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या ‘अर्थ’कारणाला लागणार ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या पाच-सात वर्षांपासून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळातून वणीमार्गे सर्वाधिक दारू पाठविली जाते.  त्यासाठी चक्क रुग्णवाहिकेसह विविध वाहनांचा वापर केला जातो.  या दारू तस्करीला शासकीय यंत्रणा व राजकीय स्तरावरून छुपे पाठबळ दिले जाते.  परंतु, आता गुरुवारी मंत्रिमंडळाने ही दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने दारूच्या या तस्करीतील कोट्यवधी रुपयांची होणारी  ‘उलाढाल’ थांबणार आहे. 
राज्यात वर्धा व गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरातही दारूबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळासह अनेक जिल्ह्यांत दारूबंदीची मागणी होऊ लागली. त्यासाठी ग्रामीण भागांतून मोठमोठी आंदोलनेही उभी झाली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढले गेले. एकीकडे नव्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदीची मागणी होत असताना चंद्रपुरातील दारूबंदीचा फेरविचार करावा, असा सूर समाजाच्या विविध गटांमधून ऐकायला मिळाला. त्यातूनच राजकीय वर्चस्वाची लढाईही सुरू झाली. 
नवी पिढी वेगळ्या वळणावर
चंद्रपुरात दारूबंदी तेवढी यशस्वी झाली नाही. या दारूबंदीने नवी पिढी वेगळ्या वळणास लागली. त्यातूनच सामाजिक समस्या निर्माण झाली.  चंद्रपूरच्या हद्दीतील अधिकृत भट्ट्या, बार, वाईनशॉप, देशी दारू, बीअर शॉपी ही दुकाने बंद असली तरी प्रत्यक्षात दारूचा अवैध कारभार त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. नदी-नाल्यांच्या काठावर सर्रास गावठी दारू काढली जाते. शेजारील जिल्ह्यांमधून चंद्रपुरात दारूचा मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पुरवठा केला जातो. चोरून मिळणारी दारू दुप्पट दरात विकली जात असल्याने त्यातील उलाढाल कोट्यवधींची होऊ लागली. त्यातील लाभाचे ‘वाटेकरी’ही अनेक घटक आहेत. 
वणी तालुका जणू मुख्य प्रवेशद्वार
चंद्रपूरला सर्वाधिक दारू पुरवठा हा यवतमाळ जिल्ह्यातून केला जातो.  त्यासाठी वणी तालुका चंद्रपुरातील अवैध दारूचे जणू मुख्य प्रवेशद्वार ठरले आहे. कधी दिवसा तर कधी रात्री ही दारू पाठविली जाते. बहुतांश दारू रोखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे छुपे पाठबळ, त्यातूनच जाणीवपूर्वक केली जाणारी डोळेझाक या बळावर सुखरूप पोहोचत आहे. एखाद्‌वेळी एखादे वाहन पकडले गेल्यास पोलिसांकडून त्याची व्यापक प्रसिद्धी करून ‘कामगिरी’ दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.  
चक्क रुग्णवाहिकेचा वापर 
पूर्वी वर्धा जिल्ह्यात कळंब, राळेगाव, बाभूळगाव, देवगावमार्गे पोहोचविली जाणारी अवैध दारू  नंतर चंद्रपुरातही पोहोचविली जाऊ लागली. वणी-शिरपूर परिसरातील सीमावर्ती भागातून दारूची एन्ट्री होत आहे. ही दारू पोहोचविण्यासाठी ट्रक, टँकर, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या, ट्रॅव्हल्स, एसटी, मुंबई पासिंगची आलिशान वाहने, एवढेच नव्हे तर रुग्णवाहिकांचाही वापर केला जातो. 
सीमावर्ती यंत्रणेवर प्रश्नचिन्ह 
राजरोसपणे जाणारी ही दारू पाहता यवतमाळ व चंद्रपूरच्या सीमावर्ती भागात दारू रोखण्यासाठी तैनात राहणारी संबंधित यंत्रणा खरोखरच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दारूच्या या व्यवसायात अल्पवयीन व अनेक शाळकरी मुलेही ओढली गेली. थोड्या पैशाचे आमिष देऊन त्यांचा वापर केला जातोय. दप्तरातून ही दारू पोहोचविली जाऊ लागली. 
दारू तस्करीने नव्या गुन्हेगारांचा उदय
या दारू तस्करीतूनच अनेक नव्या गुन्हेगारांचा उदय झाला. जणू दारू पोहोचविणारी ही स्वतंत्र पर्यायी यंत्रणाच निर्माण झाली. त्यातील उलाढाल डोळे दिपवणारी असल्याने या दारू तस्करीला राजकीय अभयही मिळू लागले. अभय देणाऱ्यांच्या निवडणुकीत मग हे दारू तस्कर आपले खिसे मोकळे करू  लागले. त्यातूनच वणी उपविभागातील सीमावर्ती पाेलीस ठाणे सर्वाधिक वरकमाईचे बनल्याने तेथे ठाणेदाराची खुर्ची पटकावण्यासाठी बोली लावली जाऊ लागली. 
वणीसाठी थेट ‘मातोश्री’वरून लाॅबिंग
आजही वणी पोलीस  ठाण्यात नियुक्ती मिळविण्यासाठी यवतमाळातील पोलीस अधिकाऱ्यांचे राजकीय मार्गाने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनावर थेट ‘मातोश्री’वरून दबाव निर्माण केला जात आहे. यावरून पोलीस अधिकाऱ्यांचे  ‘वजन’, लागेबांधे व वणी ठाण्यातील ‘इन्टरेस्ट’ अधोरेखित होतो. 
 

 भाजपच्या भूमिकेकडे दारू माफियांच्या नजरा 
- मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारूबंदी उठवली असली तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करणार का, भाजप ते स्वीकारणार का, कुणी उच्च न्यायालयात जाऊन याला आव्हान तर देणार नाही ना, असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. 
- दारूबंदी उठली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या परवानाधारक दारू विक्रेत्यांना शासनाची रीतसर मंजुरी घेणे, एक्साईज शुल्क भरणे, दुकाने सुरू करणे याला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. 
- कायदेशीर खुले असलेले मार्ग पाहता पुढील काही महिने तरी यवतमाळातून वणीमार्गे चंद्रपुरात जाणारी अवैध दारू पुढेही कायम राहील, असे दिसते. 
- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्याने आता दारू तस्करीतून होणारी कोट्यवधींची उलाढाल थांबणार आहे. पर्यायाने पोलीस ठाण्यांसाठी अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला ‘इन्टरेस्ट’ही कमी होणार आहे. 

 एक्साईजच्या संभाव्य महसुली तुटीत तस्करीचे पुरावे
- यवतमाळ जिल्ह्याच्या नावावर दिसणारी लाखो लिटर दारूविक्रीही आता घटणार आहे. पर्यायाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत शासनाला मिळणाऱ्या महसुलातही घट होईल, असे मानले जाते. 
- दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, दीव-दमण येथील बनावट दारू पाठवली जाते.  वणी विभागातील अनेक परवानाधारक दुकानदारांच्या नावे नागपुरातून निघणारी दारू परस्परच थेट चंद्रपूर जिल्ह्यात पाठवली जाते.  
- परस्पर चंद्रपुरात जाणारी दारू कागदावर मात्र वणीत पोहोचल्याचे दाखविले जाते. पोलिसांनी केलेल्या कारवाईतच या बाबीचा भंडाफोड झाला. 

 

Web Title: Most liquor supply from Yavatmal to Chandrapur via Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.