माठालाही महागाईचे ग्रहण
By admin | Published: April 21, 2017 02:24 AM2017-04-21T02:24:52+5:302017-04-21T02:24:52+5:30
‘गरिबाचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना सध्य महागाईचे ग्रहण लागले आहे. पारा ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने
असह्य उकाडा : मोठ्या ऐवजी लहान माठांना ग्राहकांची पसंती
पुसद : ‘गरिबाचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना सध्य महागाईचे ग्रहण लागले आहे. पारा ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु किमती पाहून अनेक जण आता मोठ्या माठा ऐवजी लहान माठ खरेदी करताना पुसदच्या बाजारात दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी ३० ते ४० रुपयाला मातीचा मोठा माठ मिळत असे, परंतु आता त्याच माठाची किंमत १०० ते १५० रुपये झाली आहे. त्या मागील कारणेही अनेक आहेत. मातीपासून माठ बनविण्याचा परंपरागत व्यवसाय कुंभार समाज करतो. परंतु अलिकडे सर्वच बाबीत महागाई आली आहे. माती पूर्वी फुकटात मिळायची परंतु आता कुंभारांना माती विकत घ्यावी लागते. वन विभागातून माती आणण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर माठ तयार करून ते बाजारात विकावे लागतात.
पारंपरिक पद्धतीने माठ तयार करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. कच्च्या मालात मातीसाठी ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. तयार केलेल्या माठांना भाजण्यासाठी जलतन पाच रुपये किलोप्रमाणे घ्यावे लागते. माठ बनविण्यासाठी लागणारी मेहनत आणि खर्च हा भाववाढी मागील मुख्य कारण आहे.
माठ तयार करणाऱ्या कुंभारांपासून अनेक व्यावसायिक माठ विकत घेऊन त्याची बाजारात विक्री करावी लागते. यामुळे कुंभारांना तसेही कमी पैसे मिळतात. परंतु व्यवसाय करणाऱ्याच्या खिशात अधिक पैसे जातात. स्वत: माठ विकावे तर वाहतूक खर्च आणि इतर बाबींचा विचार करावा लागतो. तसेच घरातील काही मंडळी दुकानावर बसवावी लागत असल्याने माठ तयार करण्यातही अडचणी येतात. त्यामुळे मिळल तो दाम घेऊन माठ व्यापाऱ्यांना विकले जातात. बाजारात माठांची किंमत पाहून सध्या ग्राहक मात्र थंडगार होत आहे.
परिश्रमाएवढा पैसा मिळत नाही
पाण्याचे माठ रांजण बनविणे हा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु माठ बनविण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. वन अधिकारीही त्रास देतात. तसेच बाजारात नेईपर्यंत अनेक माठ फुटतातही त्यामुळे माठ १०० ते १५० रुपयाला विकावे लागत असल्याचे व्यावसायिक दिगंबर नेतनसकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
फ्रीजपेक्षा माठाला पसंती
अनेक जण घरी फ्रीज असतानाही मातीच्या माठातील पाणी पिणे पसंत करतात. आरोग्यदायी असलेले हे पाणी पिण्यासही चवदार लागते. परंतु आता दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर गेले असल्याचे गायमुखनगर येथील गजानन घड्याळे यांनी सांगितले.