गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट; गर्भवती महिलेसह चिमुकलीचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 11:19 AM2022-03-09T11:19:28+5:302022-03-09T17:08:11+5:30
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आयता गावात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत गर्भवती महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला.
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील आयता येथील एका घराला बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. संपूर्ण घराला आगीने वेढले. या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या चार वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावरच शोककळा पसरली.
काजल विनोद जयस्वाल (३०) आणि परी विनोद जयस्वाल (४) अशी आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास काजल स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला. नंतर लगेच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. त्यावेळी घरात काजल, परी आणि काजलची सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) या तिघीच होत्या. आग लागताच तिघीही बाहेर पडल्या. मात्र चिमुकली परी काही तरी आणण्यासाठी आगीच्या वणव्यातही घरात शिरली. तिच्या मागोमाग तिची आई काजलही घरात गेली. तेथेच घात झाला. काजल आणि परी यांचा आगीत सापडून कोळसा झाला. मात्र प्रतिमा जयस्वाल कशातरी बचावल्या.
आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रशासन व अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. तब्बल दोन तासांनंतर घाटंजी आणि यवतमाळ येथून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी आपल्या परीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांच्यासह गावकऱ्यांनी जयस्वाल यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी आगीच्या फुफाट्यातून मायलेकीचे मृतदेह उचलून बाहेर आणले. त्यावेळी गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. नंतर तहसीलदारांसह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर मायलेकीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या आगीत संपूर्ण घराचाही कोळसा झाला.
पती गेले होते पालखीसोबत
आयता गावात दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी माऊली यांचे अनेक भक्त आहेत. काजलचे पती विनोदसुद्धा माउलींचे भक्त आहेत. दरवर्षी गावातून धामणगाव देव येथे पालखी जाते. मंगळवारी गावातून पालखी निघाली. त्यासोबत गावातील ३० ते ४० नागरिकही पायदळ रवाना झाले. बुधवारी सकाळी विनोद जयस्वाल दुचाकीने धामणगाव (देव) येथे गेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने ते गावाकडे परत आले. मात्र तोपर्यंत गर्भवती पत्नी व चिमुकलीचा मृत्यू झाला होता. विनोदने एकच हंबरडा फोडला. त्यांना समजविताना गावकऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळत होते.