खदानीतील खड्ड्यावर कपडे धुताना घात, माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू
By सुरेंद्र राऊत | Published: July 26, 2022 05:58 PM2022-07-26T17:58:45+5:302022-07-26T18:03:52+5:30
करळगाव शिवारातील घटना
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील करळगाव शिवारात गिट्टी खदानीच्या डबक्यात बुडून माय-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी सकाळी दोघांचा मृतदेह हाती लागला.
रुपाली शिवाजी शिंदे (३५), अजिंक्य उर्फ भोला शिवाजी शिंदे (१४) रा. इस्लामपूर जि. नांदेड ह.मु. करळगाव शेतशिवार असे मृताची नावे आहेत. सहा महिन्यापूर्वी करळगाव शिवारातील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षाच्या शेतावर कामासाठी नांदेड जिल्ह्यातून जोडपे आले होते. रुपाली शिंदे ही दररोज कपडे धुण्यासाठी शेतालगत असलेल्या खदानीच्या डबक्यावर जात होती. सोमवारी सायंकाळी मुलगा अजिंक्य याच्यासोबत डबक्यावर कपडे धुण्यासाठी गेली. मुलगा आंघोळीसाठी पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो डबक्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी रुपाली पुढे गेली. तीही पाण्यात डुबली. यावेळी शिवाजी शिंदे हा शेतात काम करीत होता. सायंकाळी उशीर झाला तरी पत्नी घरी आली नाही म्हणून त्याने शोध घेतला.
आजूबाजूच्या शेतातील गोठ्यावर चौकशी केली. तेथे त्यांना पत्नी दिसली नाही. अखेर शिवाजीने खदानीतील खड्याकडे धाव घेतली. त्यात ठिकाणी पकडे काठावर पडलेले दिसले. त्याला संशय आला, त्याने मदत बोलाविली. सायंकाळी रुपालीचा मृतदेह डबक्याबाहेर काढला. मात्र रात्र झाल्याने अजिंक्यचा मृतदेह काढता आला नाही. मंगळवारी सकाळी यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे, जमादार नितीन कोवे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अजिंक्यचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
दोन वर्षापूर्वी लहान मुलीचाही बुडून मृत्यू
नांदेड जिल्ह्यातून शेतावर कामासाठी आलेल्या शिंदे कुटुंबातील लहान मुलीचा दोन वर्षापूर्वीच पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आता त्यानंतर रुपाली व अजिंक्य या मायलेकाचाही बुडून मृत्यू झाला. शिवाजी शिंदे हे आता कुटुंबात एकटेच उरले आहे.