मुलगी बोहल्यावर चढण्याच्या मुहूर्तावरच आईचा मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:05 PM2023-02-13T12:05:43+5:302023-02-13T12:06:40+5:30
महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथील घटना
विवेक पांढरे
फुलसावंगी (यवतमाळ) : काळाचा महिमा कुणालाच कळत नाही. कधी, कोठे काय होईल, याच नेम नसतो. ऐनवेळी कोणती घटना घडेल सांगता येत नाही. काही घटना आनंदाच्या, तर काही घटना दुःखाच्या असतात. अशीच एक दुःखद घटना महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथे घडली. ऐन मुलीच्या लग्नाच्या दिवशीच आईचा मृत्यू झाला.
मंजूषा आदिनाथ चौधरी (४०) असे मुलीच्या लग्नाच्या दिवशीच काळाने झडप घातलेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. मंजूषा चौधरी यांची मोठी कन्या पूजा हिचा विवाह सेलू येथील ठाकरे कुटुंबातील प्रेम यांच्याशी जुळला व १० फेब्रुवारीला रोजी विवाह पुसद येथील एका मंगल कार्यालयात आनंदात पार पडला. दोन्ही कुटुंबीय अगदी आनंदात होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. या दोन्ही कुटुंबांच्या आनंदाच्या प्रसंगी नववधूची आई मंजूषा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुसरीकडे लग्न मंडपात सर्व पाहुणे मंडळी लग्नाचा विधी आटोपत होते, तर तिकडे रुग्णालयात नववधूच्या आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करीत होते. लग्न विधीच्या वेळी आई उपस्थित नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी व्हिडीओ कॉलवरच आईला लग्नाचा विधी दाखविला. नंतर सर्व विधी आटोपून नवरीच्या पाठवणीची लगबग सुरू असतानाच तिकडे रुग्णालयात नववधूच्या आईची प्राणज्योत मावलली. नववधू पूजा भावी जीवनाचे स्वप्न रंगवीत असतानाच आईच्या मृत्यूची वार्ता कळल्याने तिच्या स्वप्नांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
गाव बुडाले शोकसागरात
ऐन आनंदाच्या प्रसंगी मंजूषा चौधरी यांच्या अचानक जाण्याने चौधरी परिवारासह शिरपुल्ली गावावर शोककळा पसरली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. मंजूषा यांच्या मागे पती, सासू, सासरे, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्याच दिवशी रात्री शिरपुल्ली येथे अंत्यविधी करण्यात आला. मंजूषा यांच्या मृत्यूमुळे अख्खे गाव शोकसागरात बुडाले.