पुरातून मुलींना वाचविताना आईचा मृत्यू, यवतमाळातील वाघाडीची दुर्दैवी घटना
By सुरेंद्र राऊत | Published: July 22, 2023 04:00 PM2023-07-22T16:00:07+5:302023-07-22T16:02:01+5:30
घर अंगावर कोसळले : ५० घर जमीनदोस्त
यवतमाळ : शहरात शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून ढगफुटी झाली. काही तासांतच शहरातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. यामुळे शहरालगत असलेल्या वाघाडी नदीला पूर आला. या नदीचे पाणी वाघाडी येथील वस्तीत शिरले. रात्रीच्या अंधारात अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली. घरात पुराचे पाणी येत असताना दोन चिमुकल्या मुलींना घराबाहेर काढल्यानंतर आईच्या अंगावर पत्र्याचे घर कोसळले. पाण्याची पातळी वाढल्याने महिलेला बाहेर पडता आले नाही, यात तिचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेकजण वाहून गेली, ५० घरे जमीनदोस्त झाली.
शालू रवींद्र कांबळे (३५, रा. वाघाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. वाघाडी नदीला पूर आल्याने काठावरच्या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे परिसरातील ५० घरे जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला. रात्रीच्या अंधारात जीव वाचविण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. काहींनी झाडावर, पक्क्या छतावर आसरा घेतला. दरम्यान, शालू कांबळे व तिचा पती रवींद्र दोन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. पाण्यातच शालूने मुलींना घराबाहेर काढून पतीला सुरक्षितस्थळी हलविण्यास सांगितले. पती मुलींना घेऊन बाहेर पडला, त्याच्या मागे शालू बाहेर येत असतानाच संपूर्ण घर तिच्या अंगावर कोसळले. यात तिचा मृत्यू झाला.
वाघाडीमध्ये पूर आल्याची माहिती मिळताच बचाव पथक, अवधूतवाडी पोलिस, नगर परिषदेची यंत्रणा, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी घटनस्थळी पोहोचले व तत्काळ बचाव कार्य सुरू केले. १५० वर नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना रेल्वेच्या निर्माणाधीन वसाहतीमध्ये आश्रय दिला. त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मोलमजुरी करणाऱ्यांची घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. यवतमाळ शहरतील अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने माेठे नुकसान झाले. व्यापारी संकुलातील तळमजल्यावर असलेल्या दुकानांतही पाणी साचल्याने लाखोंचे नुकसान झाले.