बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:56 PM2019-06-05T13:56:03+5:302019-06-05T13:57:34+5:30
सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका गर्भवतीने बसमध्येच बाळाला जन्म दिला. कोणाचेही लक्ष नाही याची खात्री करुन बाळ बसमध्येच सोडून ती पसार झाली.
सोमवारी रात्री ७.३० च्या सुमारास पांढरकवडा आगाराची बस क्र. एमएच ०६-एस ८८२४ यवतमाळकरिता प्रवासी घेऊन निघाली. प्रत्येक थांब्यावरुन प्रवाशांची चढउतार होत होती. संध्याकाळ झाल्याने बसमधील लाईट बंद करण्यात आले. त्या अंधारातच एक गर्भवती प्रसूूत झाली आणि एका बाळाला जन्म दिला. पण गर्भवतीच्या प्रसूतीकळेचा जराही अंदाज बसमधील इतर प्रवाशांना आला नाही. महिलेने नवजात बाळाला बसमध्ये जन्म दिला. आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही याची खात्री करुन बाळाला बसमध्येच सोडून ती पसार झाली.
सदर बस यवतमाळ बसस्थानकावर आली असता सर्व प्रवासी उतरले. त्या बाळावर एकाही प्रवाशाचे लक्ष गेले नाही. कामगिरी संपल्यामुळे वाहक खाली उतरायला निघाले तेव्हा त्यांच्या पायापर्यंत रक्त आलेले दिसले. तेव्हा त्याने बसमधील मागील आसनाखाली पाहिले. तेथे एक नवजात बाळ दिसले. बसस्थानकावर उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. बाळ मृतावस्थेत होते. यवतमाळ बसस्थानक प्रमुख उजवणे, सहायक वाहतूक निरीक्षक दिगांबर गावंडे, कर्मचारी जितेंद्र दवारे आणि सदर बसचे चालक-वाहक यांनी अवधुतवाडी पोलीस स्टेशन गाठून घटनेची कल्पना दिली. पोलीस लगेच बसस्थानकावर पोहोचले. पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी नवजात बालकाला ताब्यात घेतले.