चिमुकल्या परीमागे आई धावली अन्‌ झाला स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 05:00 AM2022-03-10T05:00:00+5:302022-03-10T05:00:36+5:30

अचानक गॅसचा भडका उडाला. त्या भडक्यामुळे काजल व परीसह सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) घराबाहेर धावल्या. दरम्यान, चिमुकली परी पुन्हा घरात खेळणे आणण्यासाठी शिरली. तिला वाचविण्यासाठी सात महिन्यांची गर्भवती असलेली काजलही तिच्या मागोमाग घरात शिरली. नेमका त्याच वेळी घरातील दोन्ही सिलिंडरचा स्फोट होवून मायलेकरांचा होरपळून मृत्यू झाला. 

Mother ran after Chimukalya Pari and an explosion took place | चिमुकल्या परीमागे आई धावली अन्‌ झाला स्फोट

चिमुकल्या परीमागे आई धावली अन्‌ झाला स्फोट

Next

हरिओम बघेल/सुकुमार पवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी/सावळी सदोबा : बुधवारी सकाळी काजल स्वयंपाकासाठी गॅस पेटवीत होती. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला. त्या भडक्यामुळे काजल व परीसह सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) घराबाहेर धावल्या. दरम्यान, चिमुकली परी पुन्हा घरात खेळणे आणण्यासाठी शिरली. तिला वाचविण्यासाठी सात महिन्यांची गर्भवती असलेली काजलही तिच्या मागोमाग घरात शिरली. नेमका त्याच वेळी घरातील दोन्ही सिलिंडरचा स्फोट होवून मायलेकरांचा होरपळून मृत्यू झाला. 
तालुक्यातील आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले. बुधवारी गावात एकही चूल पेटली नाही. 
काजल विनोद जयस्वाल (३०) आणि परी विनोद जयस्वाल (४), अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकीची नावे आहेत. सुदैवाने सासू या दुर्घटनेतून  बचावली आहे. आग लागल्यानंतर तातडीने गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी आपल्या घरातून पाणी भरलेले हंडे, बादली आदी साहित्य आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आर्णी प्रशासनाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलालाही कळविण्यात आले. आगीचे रौद्ररूप बघून गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांनंतर त्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत काजल आणि परीचा जळाल्याने करुण अंत झाला होता. विशेष म्हणजे तब्बल दोन तासांनंतर यवतमाळ आणि घाटंजी येथून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आर्णी येथे अग्निशमन दल नसल्याने दूरवरून हे दल पाचारण केले होते. त्यांना येण्यास प्रचंड उशीर झाला. तोपर्यंत गावकऱ्यांनी आपल्या परीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. 
या आगीत जयस्वाल यांच्या घरातील सर्व साहित्य खाक झाले. अन्नाचा दाणाही उरला नाही. कपडेलत्तेही जळाले. घरातील वीज उपकरणेही आगीत खाक झाली. दरम्यान, आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अबोली यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात घरातील दूरदर्शन संच, फ्रिजर, फ्रीज, पलंग, अन्नधान्य, दागिने, रोख आदी खाक झाल्याची नोंद घेतली. अंदाजे पाच ते सहा लाखांचे साहित्य खाक झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.  गावात बुधवारी एकाही घरातील चूल पेटली नाही. कुणाच्याच घशाखाली अन्न गेले नाही. सायंकाळी दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर गावात परत आले. 

 पती यात्रेला गेल्यानंतर घडले अघटित 
- आयता गावात मुंगसाजी माउली यांचे अनेक भक्त आहेत. ते नेमाने दरवर्षी दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथे दर्शनासाठी जातात. तेथे पुण्यतिथी महोत्सव असतो. यावर्षी बुधवारी धामणगाव देव येथे पुण्यतिथी महोत्सव होता. आयता गावातून या महोत्सवासाठी दरवर्षी पालखी जाते. यावर्षीही मंगळवारी गावातून पालखी निघाली. तिच्यासोबत काजलचे पती विनोद जयस्वालसुद्धा गेले होते. लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी ही दु:खद घटना कळताच ते तातडीने गावात परतले. यावेळी त्यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. गावकऱ्यांनी कशी तरी त्यांची समजूत काढली. बुधवारी सायंकाळी दोघींच्याही पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. 

  कुटुंबात उरले केवळ मायलेक 
- विनोद जयस्वाल यांच्याकडे शेती नाही. त्यांच्या कुटुंबात आई प्रतिमासह पत्नी काजल आणि चिमुकली परी असे चार जण होते. विनोद ऑटो चालवीत. त्यांचे बिछायत केंद्रही आहे. त्यांच्याकडे झेरॉक्स मशीन आहे. याशिवाय ते विविध ऑनलाइन कामे करतात. मोबाइलचे रिचार्ज करून देतात. गाव आडवळणावर असल्याने अनेकांना बॅंकेत जाता येत नाही, त्यामुळे विनोद गावकऱ्यांना ऑनलाइन पैसे काढून देणे, पैसे टाकणे आदी कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. आता गर्भवती पत्नीसह चिमुकली परी मृत्यू पावल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.  विशेष म्हणजे काजल गर्भवती असल्याने तिच्या पोटातील बाळही दगावले. या घटनेमुळे आयता गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Mother ran after Chimukalya Pari and an explosion took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.