शस्त्राच्या धाकावर माहेरच्यांनी विवाहितेला पळविले
By admin | Published: November 2, 2014 10:39 PM2014-11-02T22:39:56+5:302014-11-02T22:39:56+5:30
प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला
यवतमाळ : प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला मारहाण करून शस्त्राच्या धाकावर विवाहित तरुणीला पळविले. ही घटना येथील सुरजनगरात घडली. घटनेनंतर सदर तरुणाने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी अपहरणाऐवजी धमकाविल्याचा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यामुळे या विवाहित प्रेमीयुगुलाची ताटातूट झाल्याचा आरोप होत आहे.
सुरेखा (२०) रा. नळेगाव (लातूर) असे प्रेम प्रकरणातून विवाहबद्ध झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संतोष अशोक ढोक (२५) रा. सुरजनगर असे तिच्याशी विवाहबद्ध झालेल्या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथे एका कंपनीत कार्यरत असताना दोघांचे परस्परावर प्रेम जडले. त्यांनी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यातूनच २६ जून २०१४ ला त्यांनी जालना येथील आर्य समाज या संस्थेत विधिवत विवाह केला. या विवाहाला माहेरचे विरोध करतील याची पूर्वकल्पना सुरेखाला होती. त्यामुळे तिने ही बाब माहेरच्या मंडळींपासून लपवून ठेवली. दरम्यान २८ आॅक्टोबरला ती संतोषसोबत संसार थाटण्यासाठी यवतमाळला आली. त्यापूर्वी तिने मोबाईलवरुन माहेरच्यांना विवाहाची कल्पना दिली. त्यावरून माहेरची मंडळी संतप्त झाली. त्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच घरी जाऊन संतोषला घातक शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर संधी साधून सुरेखाला वाहनात घेऊन पसार झाले. घटनेनंतर संतोषने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. मात्र या वेळी त्याची तक्रार घेतल्या गेली नाही. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांची भेट घेतली. यावेळी ठाणेदार जाधव यांनी घटनास्थळाचे कारण पुढे केले. तरी देखील मदत करायची म्हणून थातूरमातूर कारवाई केली. त्यामध्ये ५०६ कलमान्वये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यापुढे कारवाई सरकलीच नाही. त्यामुळे या प्रेमीयुगुलाची विवाहानंतरही ताटातूट झाली. (स्थानिक प्रतिनिधी)