खड्ड्याने घेतला आईचा बळी, मुलाची रस्त्यावरच गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:07+5:30
आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्यावर वाहने उसळून अनेकांचा बळी घेतला जात आहे. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी काही बोलण्यास तयार नाहीत. दारव्हा रस्त्याचे काम थांबलेले आहे. यामुळे दारव्हा येथील युवकाला आपल्या आईला गमवावे लागले. रस्त्यावर वाहन उसळून झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला. यातून कसेबसे सावरत त्या युवकाने गांधीगिरी करीत इतरांना धोका होऊ नये व शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी लाडखेडजवळ ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
युवराज पांडुरंग दुधे, रा. दारव्हा असे या युवकाचे नाव आहे. त्याची आई शोभा पांडुरंग दुधे (५५) यांचा २४ मे रोजी अपघात झाला. रुग्णालयात उपचार घेत असताना डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. यवतमाळ-दारव्हा हा रस्ता मागील वर्षभरापासून निर्माणाधीन अवस्थेत आहे. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज अपघात होत असतात. या रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती स्थानिक आमदाराच्या नावाने शिमगा करतो. तर बांधकाम विभागालाही शिव्या हासाडल्या जातात. या समस्येकडे येथील विरोधक किंवा सत्ताधारी राजकीय पक्ष लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळेच युवराज सारख्या युवकाला यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी रस्त्यावर यावे लागले. आईच्या निधनाचे दु:ख कुणालाही सहन होणारे नाही. या दु:खातून सावरत युवराजने एकाकी लढा उभारला आहे. आता त्याला कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या या प्रयत्नात इतरांनीही पुढे यावे जेणे करून रस्ता दुरुस्त होऊन होणारी प्राणहानी थांबेल, एवढीच रास्त अपेक्षा युवराजने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
दोन माजी मंत्र्यांचा परिसर तरीही रस्ता नाही
यवतमाळ-दारव्हा हा रस्ता यवतमाळ व दिग्रस या दोन विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री राहिलेल्या दिग्गज आमदारांच्या मतदारसंघातून जातो. दोघांचेही पक्षात व शासन दरबारी वजन आहे. मात्र या माजी मंत्री, आमदारांकडून रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. दीड वर्षापासून उखडलेल्या रस्त्यावर साधे खड्डेही बुजविले जात नाहीत. लोकनेते म्हणून मिरविणाऱ्या या आमदारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.