मोटारपंप दुरुस्ती कागदावरच
By admin | Published: July 10, 2017 01:00 AM2017-07-10T01:00:16+5:302017-07-10T01:00:16+5:30
तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले मोटारपंप दुरुस्तीसाठी आलेला ११ लाखांचा निधी कागदावरच खर्च झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.
११ लाखांचा निधी : नवीन मोटारपंप सात हजारात अन् दुरुस्तीवर २० हजार
किशोर वंजारी। लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले मोटारपंप दुरुस्तीसाठी आलेला ११ लाखांचा निधी कागदावरच खर्च झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषद सदस्याने तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या चौकशी पथकानेही थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे बाजारात नवीन मोटारपंप सात हजार रुपयात उपलब्ध असताना दुरुस्तीवर मात्र २० हजारांचे बिल काढण्यात आले.
नेर पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या मोटार दुरुस्तीसाठी २०१६-१७ मध्ये ११ लाखांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींची दुरुस्ती करावयाची होती. मात्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दुरुस्ती न करताच हा निधी लाटण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. नेर पंचायत समितीने हा ११ लाखांचा निधी खर्च झाल्याचे दर्शविले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांमधील सरपंच व लोकप्रतिनिधींना नेमकी कुठे दुरुस्ती केली, याचीही माहिती नाही. काही ग्रामपंचायतींनी मोटार दुरुस्तीसाठी २० हजारांचा खर्च दर्शविला.
प्रत्यक्षात तीन एचपीची नवीन मोटार बाजारात सात हजारांपासून २० हजारांपर्यंत उपलब्ध आहे. मात्र दुरुस्तीवरच २० हजारांचा खर्च दर्शविण्यात आला. यात जुनेच केबल स्टार्टर नवीन दर्शवून त्याच्या पावत्याही जोडण्यात आल्या. या कामासाठी काही ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ठरावांमध्ये अनियमितता आहे. तथापि देयक मात्र अत्यंत तत्परतेने एकाच तारखेत एकाच अभियंत्याकडून काढले गेल्याचे दिसून येते. यावरून या निधीचा मुक्त हस्ते गैरप्रकार झाल्याचे दिसून येते.
चौकशी पथकाकडून थातूरमातूर चौकशी
जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी एक पथक नेर येथे चौकशीसाठी पाठविले. परंतु या पथकाने तक्रारकर्त्याला कोणतीही विचारपूस न करता केवळ कागदपत्रांची पाहणी केल्याचा आरोप आहे. परिणामी ही चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान ज्या अभियंत्याच्या काळात हा निधी लाटण्यात आला त्याची तडकाफडकी मारेगावला बदली करण्यात आली.
मोटारपंप दुरुस्तीच्या प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार झाली. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- युवराज मेहत्रे
बीडीओ, पंचायत समिती, नेर
गेल्या दोन वर्षात मोटार कधी दुरुस्त केली याची माहिती नाही. मात्र ंआता खर्चावर स्वाक्षरी घेण्यासाठी ग्रामसेवक दबाव टाकत आहे.
- बाळासाहेब पन्नासे
सरपंच, शिरसगाव
चौकशी पारदर्शक व्हावी, प्रत्यक्ष दुरुस्ती व देयकाची चौकशी करावी, असा घोटाळा जिल्ह्यातही उघडकीस येऊ शकतो.
- निखील जैत
जिल्हा परिषद सदस्य.