गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला मटका बहाद्दरांकडून सुरूंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:57 PM2018-12-26T18:57:36+5:302018-12-26T18:57:44+5:30
शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) यांच्या मटका-जुगार बंदीच्या आदेशाला यवतमाळ-अमरावती मार्गावरील नेर शहरात खुलेआम सुरूंग लावला जात आहे.
यवतमाळ : शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) यांच्या मटका-जुगार बंदीच्या आदेशाला यवतमाळ-अमरावती मार्गावरील नेर शहरात खुलेआम सुरूंग लावला जात आहे. नेर शहर शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात असून नेर नगरपरिषदेवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष सुनीता पवन जयस्वाल यांची सत्ता आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच राज्यातील पोलीस महानिरीक्षकांची मुंबईत बैठक घेऊन राज्यभरातील मटका-जुगाराचे तमाम अड्डे आणि सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. हे धंदे बंद झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी परिक्षेत्राच्या महानिरीक्षकांवर सोपविण्यात आली होती. सुरुवातीला एक-दोन दिवस धंदे नियंत्रणात होते. मात्र त्यानंतर हे धंदे खुलेआम सुरू झाले. अलीकडे तर या मटका-जुगार काऊंटर, क्लबची संख्या यवतमाळच नव्हे तर सर्वच शहरात वाढली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेर शहरात तर शिवसेनेच्याच गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला सुरूंग लावला जात आहे. नेरमधील जुने बसस्थानक परिसरात एका पान सेंटरच्या बाजूला स्वीटमार्ट आहे. त्याच्या शेजारील रेडिमेड कापडाच्या दुकानात वर्गणीच्या पावत्या फाडाव्या तशा मटक्याच्या पावत्या फाडल्या जात आहे. मटक्याचे हे काऊंटर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांची येथून सतत ये-जा सुरू असते. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या आशीर्वादानेच हे मटका काऊंटर सुरू असल्याचे मानले जाते.
मटका-जुगार बंद आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांच्यावर असली तरी ते यात फेल झाल्याचे दिसते. नुकतेच ते वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने आठवडाभर यवतमाळ जिल्ह्यात मुक्कामी होते. मात्र त्यानंतरही कुठेच मटका-जुगार बंद झाला नाही. यावरून पोलीस प्रशासनाचेही गृहराज्यमंत्र्यांचे आदेश झुगारून मटका जुगाराला संरक्षण असल्याचे स्पष्ट होते. नेरमध्ये सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेला हा लाईव्ह मटका-जुगार गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरला आहे.