५५० शिक्षकांवर कारवाईचे गंडांतर
By admin | Published: August 11, 2016 01:03 AM2016-08-11T01:03:05+5:302016-08-11T01:03:05+5:30
जिल्हा परिषदेच्या ५५० शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. तथापि संबंधित विभाग उदासीन असल्याने त्यांच्यावर कठोर
जात पडताळणी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग उदासीन
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ५५० शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. तथापि संबंधित विभाग उदासीन असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता लांबणीवर पडत आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षण विभाग सर्वात मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांवर तब्बल आठ हजार १0१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात सात हजार ५00 शिक्षक कार्यरत आहे. यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलेले अनेक शिक्षक आहेत. काहींनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र तब्बल ५५0 शिक्षकांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. त्या सूचनांना या बहाद्दर शिक्षकांनी चक्क केराची टोपली दाखविली.
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच यवतमाळ जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यांच्यासमोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अनेक बाबी स्पष्ट केल्या. त्यांनी आपली हतबलताही व्यक्त केली. त्याचवेळी जात पडताळणी प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या त्या शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे आता या शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता बळावली आहे. आता शिक्षण विभाग संबंधित शिक्षकांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावणार आहे. (शहर प्रतिनिधी)