शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली

By admin | Published: September 21, 2015 02:32 AM2015-09-21T02:32:52+5:302015-09-21T02:32:52+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पॅकेज जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

Movement for declaration of packages for farmers | शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली

शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली

Next

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा : जलसंपदा व वीज वितरण कपंनीवर नाराजी
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पॅकेज जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय उर्वरक रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील विविध विभागांचा शनिवारी आढावा घेतला. त्यांनी विविध विभागांकडून उपाययोजना जाणून घेतल्या. यावेळी जलसंपदा विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रस्तावित पंतप्रधान पॅकेजसाठी विविध विभागांकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना सादर करायच्या होत्या. त्या अनुषंगाने हंसराज अहीर यांनी प्रस्तावित योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. त्यासाठी कृषी, जलसंपदा, वनविभाग, वीज वितरण कंपनी, शिक्षण विभाग, मत्स्य व पशुसंवर्धन विभाग, सहकार, महिला आर्थिक विकास महामंडळ, रोजगार व स्वयंरोजगार आणि राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजना त्यांनी समजावून घेतल्या.
जोडधंद्यासह मत्स्य, दुग्ध आणि पशू अशा बाबींना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी दिली. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जंगलासह वन्यप्राण्यांसाठी चांगल्या दर्जाचा चारा लावता येईल का, याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुग्ध व्यवसाय जोडधंदा म्हणून अतिशय चांगला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यासाठी योजना राबविता येईल का, अशी विचारणा करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानाच्या बंधाऱ्यामध्ये ठिकठिकाणी मत्स्य पालनाला संधी आहे. याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. स्थानिकांना गावाकडे रोजगार उपलब्ध होईल, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली. जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासंदर्भात पॅकेजसाठी विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्यासोबत कृषीपंपाना जास्तीत जास्त वीजजोडणी कशी करता येईल, यासाठी दोनही विभागांनी संवेदनशीलपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरण कंपनीचे विजय भटकर, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)

Web Title: Movement for declaration of packages for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.