बंधाऱ्याची उंची कमी करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:19 PM2018-06-09T22:19:06+5:302018-06-09T22:19:06+5:30
वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत.
दरम्यान, बंधाऱ्याची उंची कमी करण्यासाठी शुक्रवारी बंधाऱ्यावर लावण्यात आलेल्या सळाखी काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधीनी याबाबत पालिकेचे अभियंता ढेपले यांना विचारणा केल्यानंतर सळाखी काढण्याचे काम थांबविण्यात आले. वणी शहरातून वाहणाºया निर्गुडा नदीचा जलस्तर कायम रहावा, त्यात पाणी साठून रहावे यासाठी वणी नगरपालिकेने निर्गुडा नदीवरील जॅकवेलजवळ २७ मे २०१७ रोजी बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. करारानुसार हा बंधारा एक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जून महिना सुरू झाल्यानंतरही केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत ६८ लाख ४१ हजार रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात येत आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसांपासून या भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदीचा जलस्तर वाढला. त्यातच नवरगाव धरणातून सोडलेले पाणी चार दिवसांपूर्वी वणीत पोहचले. मात्र बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. नदी परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या जागा असून त्या ठिकाणी इमारती उभारल्या जाणार आहे. उंच बंधारा बांधल्यास पुराचा धोका वाढण्याची या व्यावसायिकांना भीती आहे. त्यामुळे बंधाऱ्याची उंची वाढू नये असे त्यांना वाटते.