वेतनासाठी ‘वसंत’च्या कामगारांचे आंदोलन
By admin | Published: April 11, 2016 02:42 AM2016-04-11T02:42:34+5:302016-04-11T02:43:33+5:30
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन तब्बल १६ महिन्यांपासून थकीत असून संतप्त झालेल्या कामगारांनी रविवारी आंदोलनाचे शस्त्र उपसले.
साखरेचे ट्रक अडविले : १६ महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन तब्बल १६ महिन्यांपासून थकीत असून संतप्त झालेल्या कामगारांनी रविवारी आंदोलनाचे शस्त्र उपसले. कारखान्यातून बाहेर जाणारे साखरेचे ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. त्यावेळी प्रशासन आणि कामगारांत तणाव निर्माण झाला होता.
वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईस आला आहे. यंदा तर केवळ १३ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले.
कारखान्याच्या इतिहासात एवढे कमी गाळप झाले. गत १६ महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार आंदोलने करूनही या कामगारांना वेतन दिले जात नाही. वेतनासाठी कामगार संघटनेचे नेते पी.के. मुडे आणि व्ही.एम. पतंगराव यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी कारखान्यापुढे ठिय्या दिला. कारखान्यातून साखर घेऊन जाणारे ट्रक अडविले. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.
दरम्यान, कारखान्यातून साखर घेऊन जाणारे अनेक ट्रक अडकले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतला नव्हता.
सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीत
वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घोषित झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकही निवडणुकीत व्यस्त दिसत आहे. कामगारांची बाजू घेण्यासाठी आता कुणीही नाही. जो तो आरोप-प्रत्यारोप करीत आहे. कारखाना आर्थिक डबघाईस असताना आणि कामगार आंदोलन करीत असताना कुणीही त्यांची बाजू मांडताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)