गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:19 PM2018-07-22T21:19:52+5:302018-07-22T21:21:08+5:30

आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे.

Moving rumored names in criminal life | गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

Next
ठळक मुद्देवर्तनात क्रौर्य, नावात गंमत : दहशत पसरविण्यासाठी आगळ्या वेगळ्या नावांचा केला जातो वापर

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे. यवतमाळातील गुन्हेगारीचा आलेख जसजसा वाढतोय, तसतशी नवनव्या गुन्हेगारांची नवनवी चित्रविचित्र टोपण नावेही समोर येत आहेत. वरवर चामत्कारिक वाटणारी ही नावे सामान्य माणसांना आतल्या आत मात्र घाबरवून सोडत आहेत.
‘बस नाम ही काफी है’ हा चित्रपटातील डॉयलॉग फेमस आहे. यवतमाळच्या गुन्हेगारी जगतातील नवोदित गुंडांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी टोपण नावे धारण केली आहेत. पोलीस रेकॉर्डवरही त्यांची याच नावाने नोंद आहे. यवतमाळ शहराच्या गुन्हेगारीचा प्रवास बघता पूर्वीच्या नावांमध्ये एक जरब दिसून येते. तर आताची टोपण नावे विकृत स्वरूपाची आहेत. अर्थातच पूर्वीपेक्षा गुन्हेगारांच्या क्रूरतेचे प्रमाणही वाढले. आता किरकोळ वादात थेट खून करण्याचे प्रकार वाढत आहेत.
गट्ट्या आणि पीडी ही गुन्हेगारी जगतात सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली टोपण नावे आहेत. गट्ट्या म्हणजे प्रशांत दुबे आणि पीडी म्हणजे प्रवीण दिवटे, कधी काळी सोबतच काम करणारे हे दोघे एकमेकांचे शत्रू बनले. मात्र, वर्चस्वाच्या संघर्षाने दोघांनाही संपवले. त्यांचे अंधानुकरण करणारे गल्लीबोळातील अनेक गुन्हेगार तयार झाले आहेत. त्यांची टोपण नावेही तितकीच मजेशीर आहेत.
वर्चस्वाच्या वादातून जामनकरनगरमध्ये यादव व पवार टोळीत संघर्ष झाला. यात पुढे आलेल्या टोपण नावाने सर्वांनाच धक्का दिला. ‘सोनू ऊर्फ संडास’ एखाद्याचे नाव संडास असू शकते ही कल्पनाच अनेकांना विचित्र वाटली. पण हा ‘संडास’ काही साधासुधा नाही. त्याने २०१५ मध्ये सलमान सोलंकीचा गेम केल्याचा आरोप आहे. आता प्राणघातक हल्ल्यात तो पुन्हा जेरबंद झाला आहे.
यवतमाळची गुन्हेगारी राजकीय आश्रयावर पोसली जात आहे. ‘व्हाईट कॉलर’कडून अल्पवयीन मुलांचा वापर होतो. अनेक गोष्टी तपासत रेकॉर्डवर आणल्या जात नाही. त्यामुळेच येथे १५ ते २५ वर्षे वयोगटातील सक्रीय व तितकेच क्रूर गुन्हेगार पाहावयास मिळतात. घरफोड्या, चोऱ्या व वाटमारी करणाºयांचीही एक वेगळी कॅटेगिरी आहे. या सर्वांचीच टोपण नावे वाचायला, ऐकायला विचित्र अन् विक्षिप्त वाटणारी आहेत. एखाद्याच्या नावातूनही त्याची वैचारिक स्थिती लक्षात येते. गुन्हेगारांना ही नावे त्यांच्या टोळक्यातील स्वकीयांकडूनच देण्यात आली आहे, हे विशेष.
फोक्याभाई, हड्डी, लेंडी अन् झुरक्याही !
पोक्या (घरफोडी), फोक्याभाई, हड्डी, झुरक्या, मोगण्या, लॅपटॉप, बगीरा (दोघे अक्षय टोळीचे सदस्य), लायण्या, डोमा, भोकण्या, चिकण्या (घरफोडीत मास्टर), कोंबडी, जादू (सायकल चोर), लेंडी (शरीर दुखापतीचे गुन्हे), कवट्या, सागवान, कमची, येडा, लेड्या, मकडी, जॉन्टी, आठ-नऊचा पाणा, लांजा, गवत्या, काल्या, हकल्या (हा उभरता गँस्टर) तडी, अंक्या, साधू, खटक्या, टावर, आंड्या, टकल्या, हॅँडल ही गुन्हेगारी जगतात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली नावे आहेत.

Web Title: Moving rumored names in criminal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.