शिळोणाची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल
By Admin | Published: March 31, 2017 02:30 AM2017-03-31T02:30:56+5:302017-03-31T02:30:56+5:30
स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत पुसद पंचायत समितीने हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.
गावकऱ्यांचे सहकार्य : पुसद पंचायत समितीचा पुढाकार
पुसद : स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत पुसद पंचायत समितीने हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. या मोहीमेला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत असून, चार हजार लोकसंख्येचे शिळोणा गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. गावात नागरिकांनी शौचालय बांधले असून, त्याचा वापरही केल्या जात आहे.
संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत पुसद पंचायत समिती क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेतले. या गावात ही मंडळी जाऊन जनजागृती करीत आहेत. पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर.व्ही. पुजारी यांनी शिळोणा गाव दत्तक घेतले. सुरूवातीला या गावात बोटावर मोजता येईल एवढीच शौचालये होती. मात्र गाव दत्तक घेतल्यानंतर गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी. मनवर, बालविकास प्रकल्प अधिकारी सीमा बांदे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात आली. गावाचे सरपंच गजानन पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तोंडबाराव चिरंगे, पोलीस पाटील हरिभाऊ चिरंगे, मुख्याध्यापक नरसिंग चव्हाण, ग्रामविकास अधिकारी काळबांडे, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला. आता या गावात शौचालय बांधण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहे. सुरूवातीला अर.व्ही. पुजारी यांनी शालेय मुलांना हागणदारीबाबत मार्गदर्शन केले. आपल्या पालकांना शौचालय बांधण्याचा आग्रह करण्यास सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन आतापर्यंत ६२ शौचालय बांधण्यात आली. ९० शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या गावातील प्रत्येक घरी शौचालय बांधून हागणदरीमुक्त गावाचा मानस पुजारी यांनी व्यक्त केला. (कार्यालय चमू)