खासदार भावना गवळी हरविल्या.. भाजप महिला मोर्चाची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:06 PM2022-03-23T17:06:44+5:302022-03-23T18:32:39+5:30
जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाने शहर पोलिसात खासदार भावना गवळी हरविल्याची तक्रार दाखल केली.
यवतमाळ : शिवसेनेकडून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. परंतु, या अभियानात यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी दिसून आल्या नाहीत. तसेच, त्या मागील सहा महिन्यापासून मतदारसंघात फिरकल्या नसल्याचे कारण देत भाजपने 'खासदार दाखवा.. बक्षिस मिळवा' असे पोस्टरच शहरात लावून टाकले. तर, आता जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाने खासदार भावना गवळी हरविल्याची तक्रार दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.
मुंबईत सुरू असलेली शिवसेना-भाजपमधील राजकीय कुरघोडी आता गावपातळीवर उतरली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हा हायव्होल्ट ड्रामा जिल्हास्तरावरही राबवावा, असाच अजेंडा सध्या तरी दिसत आहे. भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांनी बुधवारी यवतमाळ शहर ठाणेदारांच्या नावाने तक्रार अर्ज दिला.
खासदार भावना गवळी आमच्या मतावर निवडून आल्या. मी एक मतदार म्हणून मागील सहा महिन्यांपासून अनेक समस्यांचा सामना करीत आहे. माझ्या प्रमाणेच सामान्य जनतेलाही अनेक अडचणी आहेत. याबाबतचे साधे निवेदन द्यायचे असेल, तरी कुणाला द्यावे, आमच्या समस्या कोण सोडविणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. खासदार गवळी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता तो बंद येत आहे. समर्थवाडी येथील निवासस्थानी कुणी उपस्थित नसते. त्यामुळे आमच्या खासदार हरविल्याची तक्रार दाखल करून आपण त्यांचा शोध घ्यावा, असे या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून खासदार भावना गवळी मतदारसंघात दिसून न आल्याने 'खासदार दाखवा बक्षीस मिळवा' असे बॅनर भाजपने लावले होते. भाजपने लावलेले बॅनर शिवसैनिकांनी काढून टाकले. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाने जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे.