अर्धा डझन गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ची तयारी
By admin | Published: March 1, 2015 02:02 AM2015-03-01T02:02:53+5:302015-03-01T02:02:53+5:30
जिल्ह्यातील अर्धा डझन गुंडांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अॅक्टीव्हीटीज अर्थात झोपडपट्टी दादा कायदा) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील अर्धा डझन गुंडांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अॅक्टीव्हीटीज अर्थात झोपडपट्टी दादा कायदा) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
संघटित गुन्हेगारी कारवायांसाठी यवतमाळ शहर अमरावती परिक्षेत्रात टॉपवर आहे. येथे गुन्हेगारांच्या विविध टोळ्या कार्यरत असून त्यांच्यात आपसात अनेकदा खटके उडतात. त्यातून रक्त सांडते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अलीकडच्या काळात शहरातील संघटित गुन्हेगारी शांत होती. मात्र गेल्या आठवड्यात सुपारीच्या वादातून कुणाचा तरी गेम करण्याच्या दृष्टीने यवतमाळात दाखल झालेल्या टोळीचा मनसुबा पोलिसांनी उधळून लावला. सुमारे २० जण वेगवेगळ्या वाहनातून आले होते. मात्र त्यातील केवळ एकच टोळके शस्त्रांसह पोलिसांच्या हाती लागले. या टोळीकडून पोलिसांना भविष्यातील हालचालींचा अंदाज आला. या हालचाली रेकॉर्डवर घेतल्या गेल्या नसल्या तरी भविष्यातील शांततेच्या दृष्टीने पोलिसांनी आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाच ते सहा गुडांवर एमपीडीए अंतर्गत किमान वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. प्रभारी पोलीस महानिरीक्षकांनी त्यासंबंधी मौखिक सूचना दिल्या असून पोलीस एमपीडीए प्रस्तावाच्या तयारीला लागले आहेत. यवतमाळ शहरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात एमपीडीएचे हे प्रस्ताव तयार केले जात आहे. साहेब गुंडांना गजाआड पाहण्याची मनीषा ठेवत असताना पोलिसातीलच कुण्यातरी कर्मचाऱ्यांनी एमपीडीएच्या संभाव्य यादीतील गुंडांना ‘अलर्ट’ केले आहे. त्यामुळे हे गुंड आतापासूनच भूमिगत झाल्याची माहिती आहे. पोलिसात राहून गुंडांची पाठराखण करणारे ते ‘बिभीषण’ कोण हे शोधण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. पोलिसांचे गुन्हेगारी वर्तुळातील ‘लागेबांधे’ यापूर्वीही प्रकाशात आले होते.
त्यामुळे काहींना यवतमाळ शहरातून आणि वरिष्ठांच्या मर्जीतील स्कॉडमधून दूरही केले गेले. मात्र त्यानंतरही पोलीस दलात गुंडांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे काही झारीतील शुक्राचार्य अद्याप कायम असल्याचे एमपीडीएतील ‘अलर्ट’वरून दिसून येते. हे विभिषण-शुक्राचार्य शोधण्यात पोलीस प्रशासनाला कितपत यश येते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)