मि.परफेक्शनिस्ट आमीर साक्षात बंदीभागात
By admin | Published: April 27, 2017 12:25 AM2017-04-27T00:25:36+5:302017-04-27T00:25:36+5:30
उमरखेड तालुक्यातील बंदीभाग तसा उपेक्षितच. विविध समस्या आणि पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. परंतु या भागातील गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक
दुष्काळाशी दोन हात : एकंबा-कृष्णपूरमध्ये ग्रामस्थांशी साधला आपुलकीने संवाद
राजेश पुरी ढाणकी
उमरखेड तालुक्यातील बंदीभाग तसा उपेक्षितच. विविध समस्या आणि पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. परंतु या भागातील गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात बंदी भागात यावे लागले. बुधवारी तो हेलिकॉप्टरने दाखल झाला. गावकऱ्यांशी संवाद साधला. नेहमी पडद्यावर दिसणारा हा हिरो बंदी भागातील नागरिकांनी अगदी जवळून न्याहाळला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने चित्रपट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव बंदी भागातील एकंबा आणि कृष्णपूरला येणार असल्याची वार्ता दोन दिवसांपासून कर्णोपकर्णी पसरली होती. अनेकांचा त्यावर विश्वासही बसत नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने दौराही गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र बुधवारी सकाळी बंदी भागाच्या विस्तीर्ण जंगलावर निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले आणि लोकांना आमिर खान आल्याची खात्री पटली. त्याला डोळ्यात साठविण्यासाठी सुरू झाली प्रत्येकाची धडपड. आमिरला घेवून येणारे हेलिकॉप्टर सकाळी ८.१५ वाजता जेवलीच्या राजाराम बापू पाटील विद्यालयाच्या मैदानावर उतरले. निवडणूक काळातही नेत्यांचे हेलिकॉप्टरही न येणाऱ्या या भागात पहिल्यांदाच एका अभिनेत्याचे हेलिकॉप्टर उतरले. विनम्रपणे हात जोडत आमीर खान हेलिकॉप्टरच्या बाहेर आला. त्याचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर थेट टाटा स्पेसीओ जीपमधून आमिर आणि किरण एकंबा गावाकडे निघाले. एकंबात पोहोचताच सौजन्या संतोष पांडे यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी आमिरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जो तो आमिरला जवळून बघता यावे म्हणून धडपडताना दिसत होते. यात प्रशासनाचे अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचाही समावेश होता.
एकंबा येथे पोहोचल्यानंतर आमिर थेट गावालगतच्या जंगलात पोहोचला. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या माती नाला बांधाचे पाहणी केली. त्या ठिकाणी गावकऱ्यांसोबत संवाद साधला. एकंबाजवळील जंगलात काही ग्रामस्थांसोबत आमिरने शूटिंगही केले. तेथून दुपारी १ वाजताच्या सुमारास आमिरचे ढाणकीजवळच्या कृष्णापूर येथे आगमन झाले. वॉटर कप स्पर्धेबद्दल त्याने गावकऱ्यांशी संवाद साधला. सुरक्षा व्यवस्था कडेकोट असतानाही जलसंधारणाची तळमळ ही सुरक्षाही रोखू शकली नाही. त्याने आस्थेने साधलेला संवादाने गावकरी हरखून गेले.
किरण रावची दिलगिरी
आमीर खान यांची पत्नी किरण राव यांनी कृष्णापूर येथील महिलांशी संवाद साधून तुम्ही फार चांगलं काम करीत आहात. मला याचा आनंद होतो, असे म्हणत आम्हाला येण्यास थोडा उशीर झाला. त्याबद्दल माफी मागते, असे विनम्रपणे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसांची सहृदयता अनुभवली.